सोलापूर : अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ बचाव समितीच्या तक्रारीची दखल घेत विभागीय सहनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी चौकशीसाठी लेखापरीक्षक पी. आर. शिंदे यांची नेमणूक केली होती.
शिंदे यांनी दिलेल्या अहवालानुसार संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी नोटीस देऊन संचालक मंडळ, दूध संघाचे म्हणणे ऐकून घेतले.
त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास पांढरे यांची नेमणूक केली आहे.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था पदुम) श्रीनिवास पांढरे हे अध्यक्ष, तर सहायक निबंधक सहकारी संस्था (दूध) डॉ. वैशाली साळवे व सहकार अधिकारी सहकारी संस्था दूध व्ही. जे. वडतिले हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
तीच तारीख.. तोच महिना१) तत्कालीन संचालक मंडळाच्या अशाच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. त्यावेळी विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी ८ मार्च २०२१ रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे यांचे प्रशासकीय मंडळ नेमणूक केले होते.२) पांढरे यांचे प्रशासकीय मंडळ असताना वर्षभरातच संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये ८ मार्च २०२२ रोजी हे संचालक मंडळ सत्तेवर आले.३) दूध संघ बचाव समितीच्या तक्रारीवरून चौकशी झाल्यानंतर विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश विभागीय सहनिबंधकांनीच काढला व तो ७ मार्च २०२५ रोजी अंमलबजावणीसाठी आला आहे.
८८च्या चौकशीवरील स्थगिती कायम- सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बेकायदेशीर कारभारावर तक्रारीचे निवेदन देत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी दूध संघ बचाव समितीचे अध्यक्ष अनिल अवताडे व उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे यांनी केली होती. या तक्रारींची ८३ अन्वये चौकशी विभागीय उपनिबंधक वैशाली साळवे यांनी केली होती.- साळवे यांच्या अहवालावर कलम ८८ अन्वये चौकशीसाठी सहकार खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी पी. जी. कदम यांची नेमणूक करण्यात आली होती. ८८ ची नोटीस संचालक मंडळाला निघताच दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी शासन स्तरावरून कलम ८८ अन्वयेच्या चौकशीला २१ जून २०२४ रोजी स्थगिती आणली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटला. मात्र ८८ चौकशीवरील स्थगिती कायम आहे.
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर