Join us

दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:09 PM

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. मुरघाससाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो.

जुन्नर तालुक्यातील माळशेजच्या ग्रामीण भागातील पशुपालकांचा आता मुरघास निर्मितीकडे कल वाढला आहे. ओला चारा कडबा कुट्टी यंत्राच्या साहाय्याने बारीक करून तो मोठमोठ्या बॅगांमध्ये साठवून ठेवून पुढे अनेक दिवस गरजेप्रमाणे वापरता येतो.

अलीकडील काळात माळशेज परिसरात अनेक ठिकाणी जागोजागी मुरघासच्या बॅगा भरून ठेवलेल्या दिसत आहेत. गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा गाई, म्हैशी पालनाकडे कल वाढला आहे. परंतु, ओल्या चाऱ्याची सर्वांनाच नेहमी टंचाई भासते. चाराटंचाईवर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून मोठमोठ्या गोठ्यांत मुरघास निर्मिती करून ओला चारा अनेक महिने साठवून ठेवण्याची पद्धत प्रचलित होती.

पण, मुरघासविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे व यंत्रणेच्या अभावामुळे लहान ओला चारा कडबा कुट्टी यंत्राच्या साहाय्याने बारीक करून तो मोठ्या बॅगांमध्ये साठवून ठेवला आहे. शेतकरी व पशुपालक तिकडे वळत नव्हते. पण, आता हळूहळू बऱ्यापैकी शेतकरी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या हिरव्या मक्याच्या वैरणीपासून मुरघास निर्मिती करताना दिसत आहेत.

अनेक शेतकऱ्यांकडे कडबा कुट्टी यंत्र नसल्यामुळे त्यांना मुरघास निर्मितीसाठी अडचण होत होती. पण, आता गावोगावी अनेक शेतकरी लहान ट्रॅक्टरवर मुरघास यंत्र बसवून शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीने मुरघास तयार करून देत आहेत. काही व्यावसायिक त्याची विक्रीही करत आहेत. साधारणपणे ८०० ते १००० किलोपर्यंत साठवण क्षमता असलेल्या या प्लास्टिकच्या बॅग सहजतेने उपलब्ध होत आहेत.

विविध आकारांत उपलब्ध असलेल्या या मोठमोठ्या बॅगामध्ये कुट्टी यंत्राच्या साहाय्याने बारीक केलेला ओला मका तुडवून भरला जातो. तो भरत असताना त्यामध्ये मीठ, गूळ आणि विशिष्ट प्रकारच जिवाणू कल्चर पावडर वापरली जाते. त्यानंतर या बॅगा पूर्ण भरून त्यांचे तोंड गच्च बांधून हवाबंद करून ठेवण्यात येते.

दुधाची प्रत सुधारतेमुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. मुरघाससाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. मुरघासमुळे दुधाची प्रत सुधारते. त्याचबरोबर मुरघास पचनीय चारा असल्यामुळे जनावरांचे आजार कमी होतात. म्हणून विकसित होत आहे. मात्र, मुरघासनिर्मितीसाठी शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

मुरघास म्हणजे काय?मुरघास म्हणजे हवाविरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा. या पद्धतीत हवाविरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्डयात, पिशवीत भरला जातो, तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छवास सुरू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडाय ऑक्साइड तयार होते. चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. खड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे जिवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब होत नाही.

अधिक वाचा: हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीगायशेतीमकापीक