अरुण बारसकरसोलापूर : जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मागील अनुदानाला मुकलेल्यांसह राज्यातून ८०४ दूध संस्थांना लॉग इन आयडी देण्यात आला आहे.
राज्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला होता. दूध उत्पादक संघांकडून दिल्या जाणाऱ्या दराशिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी राज्यातून १८ जिल्ह्यांतील २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. त्या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते.
त्यानंतरही दूध खरेदी दरात वाढ न होता आणखीन घसरण झाल्याने राज्यातून दूध अनुदान मागणीचा दबाव सरकारवर वाढला होता. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यासाठी २३ जिल्ह्यांतील ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत.
कोल्हापूरचा एकही प्रस्ताव नाही११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १३ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील अनुदानासाठी एकाही दूध संस्थेने अनुदानासाठी अर्ज केला नाही. याशिवाय इतर जिल्ह्यांतील संस्थांची संख्या वाढली आहेच, शिवाय पाच जिल्हेही वाढले आहेत. येणाऱ्या काळात आणखीन काही संस्था वाढण्याची शक्यता आहे.
| जिल्हा | जानेवारी ते मार्च | ऑगस्ट ते ऑक्टोबर |
| पुणे | ३२ | ८१ |
| सातारा | २४ | ५८ |
| सोलापूर | १८ | ८९ |
| कोल्हापूर | १२ | ०० |
| सांगली | १२ | ३० |
| नागपूर | ०३ | ०४ |
| गोंदिया | ०० | ०१ |
| वर्धा | ०० | ०१ |
| भंडारा | ०२ | ०२ |
| अहमदनगर | ७४ | १६० |
| जळगाव | ०२ | १२ |
| नाशिक | १८ | ५२ |
| धुळे | ०३ | ०९ |
| बीड | ०६ | १२ |
| छ. संभाजीनगर | १२ | २२ |
| धाराशिव | १३ | ३३ |
| जालना | ०१ | ०४ |
| लातूर | ०१ | ०६ |
| नांदेड | ०० | ०४ |
| परभणी | ०० | ०४ |
| अमरावती | ०० | ०२ |
| बुलढाणा | ०२ | ०२ |
| यवतमाळ | ०० | ०२ |
| एकूण | २४४ | ५९० |
जानेवारी ते मार्चच्या अनुदानासाठी २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव आले आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदानाची रक्कम राज्यात प्रथमच जमा होत आहे. शासन ते शेतकरी अशी दूध अनुदान योजना राबविण्यात येत आहे. - प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्ध विकास