कोल्हापूर : राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ अखेर दूध अनुदान योजना राबवली होती. यामध्ये राज्यातील चार लाख ४२ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना १५४९ कोटी २७ लाखांचे अनुदान मिळाले आहे.
सर्वाधिक अनुदान पुणे जिल्ह्याला ४५८ कोटी रुपयांचे मिळाले आहे. अद्याप सात हजार ३५६ शेतकऱ्यांचे ३७ कोटी ३१ लाख रुपये अनुदान प्रलंबित आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून गाय दुधाचे उत्पादन वाढले आणि बाजारात मागणी नव्हती. त्यामुळे राज्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात करण्यास सुरुवात केली.
काही खासगी दूध संघांनी २० रुपये लिटरने खरेदी करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. यासाठी राज्य शासनाने ११ जानेवारी २०२४ पासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू केले.
हे अनुदान दोन महिने सुरू ठेवल्यानंतर बंद केले. तरीही बाजारात दुधाचे दर वाढले नसल्याने १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले.
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने अनुदानात वाढ करत नोव्हेंबर अखेर कायम केले. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर मिळाले नाहीत. माहिती भरताना तांत्रिक अडचणी आल्याने वेळेत अनुदान मिळण्यास विलंब हाेत गेला.
प्रमुख जिल्ह्यांना असे मिळाले अनुदानजिल्हा - अनुदानपुणे - ४५८ कोटीअहिल्यानगर - ४४१ कोटीसोलापूर - १८४ कोटीसातारा - १०० कोटीसांगली - ९१ कोटीकोल्हापूर - ७३ कोटीनाशिक - ५६ कोटीछत्रपती संभाजीनगर - ३९ कोटीबीड - २१ कोटीजळगाव - १७ कोटीधाराशिव - १४ कोटीनागपूर - ११ कोटीधुळे - १ कोटीबुलढाणा - ८१ लाखभंडारा - ७३ लाख
राज्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदान वर्ग करण्यात आले आहे. दुधाची माहिती व्यवस्थित भरली नसल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे अगदी थोड्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे, दुरुस्तीनंतर त्यांनाही दिले जाईल. - प्रकाश मोहोड (आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास)
अधिक वाचा: शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार