Join us

गोठ्यातील स्वस्त, सोपा आणि सुरक्षित स्वच्छतेचा उपाय; ‘हे’ रसायन ठरतंय रोगराईवर रामबाण पर्याय

By रविंद्र जाधव | Updated: September 18, 2025 15:56 IST

पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते.

पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते.

जनावरांना आजार होऊ नयेत गोठे स्वच्छ राहावेत आणि संसर्ग पसरू नये यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येतो. यामध्ये पोटॅशियम परमँगनेट हे एक नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. 

पोटॅशियम परमँगनेट म्हणजे काय?

साधं शब्दात सांगायचं तर पोटॅशियम परमँगनेट हे एक जंतुनाशक आहे. याचा रंग गडद जांभळा असतो आणि पाण्यात मिसळल्यावर तो गुलाबी किंवा जांभळा रंग दाखवतो. बाजारात हे छोट्या पुड्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये सहज मिळते. अगदी थोड्या प्रमाणात वापरून मोठा फायदा मिळू शकतो.

जनावरांच्या आरोग्यासाठी उपयोग

जखमा धुणे : जर जनावराला खरचटले असेल, जखम झाली असेल, किंवा खरूजसारखे त्वचेचे विकार असतील, तर सौम्य द्रावण (पाण्यात मिसळलेले) करून त्या भागावर वापरल्यास आराम मिळतो.

पाय व खुरांची स्वच्छता : पावसाळ्यात किंवा ओलसर गोठ्यात जनावरांच्या खुरांमध्ये घाण साचते. अशावेळी पाय धुण्यासाठी पोटॅशियम परमँगनेट वापरल्यास जंतू मरतात आणि फोड किंवा सड होण्याचा धोका कमी होतो.

गोठ्याची साफसफाई : पाणी स्वच्छ करून त्यात थोडे पोटॅशियम परमँगनेट टाकून गोठ्याचा मजला, trough, पाणी पिण्याची पात्रं धुतल्यास संसर्ग टाळता येतो.

पिण्याच्या पाण्यात वापर : काही वेळेस कुडं पाणी स्वच्छ करण्यासाठी थोड्याशा प्रमाणात पोटॅशियम परमँगनेट टाकले जाते, पण यासाठी योग्य प्रमाण माहित असणे गरजेचे आहे.

वापरताना काळजी

• पाण्यात खूप जास्त प्रमाणात टाकल्यास पाण्याचा रंग काळसर होतो आणि जनावरांनाही त्रास होऊ शकतो.

• त्यामुळे नेहमी अगदी थोडं उदा. १ लिटर पाण्यासाठी १–२ कण (crystals) एवढंच वापरावं.

• जखमेवर वापरताना त्याला थेट न लावता, पाण्यात मिसळून सौम्य द्रावण करूनच वापरावे.

• वापरल्यावर नेहमी बाटली बंद ठेवावी आणि लहान मुलांपासून दूर ठेवावी.

शेतकरी आणि पशुपालकांसाठी फायदेशीर का?

• हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि सोपं वापरता येणारं एक जंतुनाशक आहे.

• पशुपालकांच्या दैनंदिन वापरात हे एक घरगुती आरोग्य रक्षक औषध म्हणून ठरू शकतं.

• नियमित स्वच्छतेने जनावरांना आजार होण्याची शक्यता कमी होते तथापी औषधावरचा खर्च वाचतो आणि जनावरांची उत्पादनक्षमता वाढते.

पोटॅशियम परमँगनेट हे जनावरांच्या आरोग्यासाठी एक साधं पण प्रभावी साधन आहे. गोठ्याची स्वच्छता, जखमा धुणं, पायांची निगा अशा अनेक गोष्टींसाठी याचा उपयोग करता येतो.

योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरल्यास हे तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना फायदेशीर ठरू शकतं. मात्र तरीही वापरण्याआधी आपल्या गोठ्यातील परिस्थितीची माहिती जवळील पशुवैद्यक अधिकाऱ्यांना देत त्यांच्या सल्लानुसार वापर करावा.

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेळीपालनशेती क्षेत्रशेतीशेतकरी