Join us

आटपाडीच्या कार्तिक यात्रेत ४ कोटींची उलाढाल; सोमनाथ जाधव यांचा माडग्याळ मेंढा ठरला ‘हिंदकेसरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:18 IST

यावर्षी आटपाडीच्या कार्तिक यात्रेत सुमारे १,२०० पेक्षा अधिक शेळ्या आणि मेंढ्या दाखल झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

आटपाडी : आटपाडीच्या पारंपरिक उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रेला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यात्रेच्या पशुधन बाजारात चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यावर्षी सुमारे १,२०० पेक्षा अधिक शेळ्या आणि मेंढ्या दाखल झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्तिक पौर्णिमेनिमित्त आटपाडी येथे शेंळ्या-मेंढ्यांच्या पारंपरिक पशुधन यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली.

दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत तालुक्यातील तसेच शेजारील सांगोला, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, माण या भागातील शेकडो शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठ गाठली. स्थानिक पशुपालकांनी आपल्या उत्तम जातीच्या मेंढ्या, शेळ्या आणि बकऱ्यांचे प्रदर्शन केले.

पशुधन खरेदी-विक्रीमध्ये विशेष आकर्षण ठरला तो सोमनाथ जाधव यांच्या माडग्याळ येथील ‘बकरा’! ज्याने यात्रेतील पारंपरिक स्पर्धेत ‘हिंदकेसरी बकरा’ हा मान पटकावला. या बकऱ्याच्या देखण्या बांध्याने आणि दमदार शरीरयष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

यात्रेच्या निमित्ताने आटपाडी शहरातील बाजारपेठ, हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते, वाहनचालक, तसेच दैनंदिन कामगारांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला.

यात्रेत पशुधनासोबतच शेतीसंबंधी साधने, जनावरांचे खाद्य, औषधे, तसेच स्थानिक हस्तकला वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली.

बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने यात्रेच्या दरम्यान सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी केली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आटपाडी कार्तिक यात्रा ही पशुधन व्यापारासोबतच सामाजिक-सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक बनली असून, यावर्षीची चार कोटींची उलाढाल ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारी ठरल्याचे जाणकारांनी सांगितले.

‘उस्मानाबादी’, ‘जमखेडी’, ‘माडग्याळ’ ‘हायब्रीड’ची खरेदी◼️ यावर्षी आटपाडीच्या बाजारात ‘उस्मानाबादी’, ‘जमखेडी’, ‘माडग्याळ’ आणि ‘हायब्रीड’ जातींच्या मेंढ्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली.◼️ अनेक व्यापाऱ्यांनी सांगोला, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कराड भागातूनही आवर्जून उपस्थिती लावली.◼️ याच बरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील ही व्यापारी उपस्थित होते.◼️ शेळी-मेंढ्यांच्या विक्रीतून सुमारे चार कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, यामध्ये लहान शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्याचेही सांगितले जाते.

अधिक वाचा: १० वर्षांपासून डाळिंबाची युरोपला निर्यात; बिदालचा 'हा' शेतकरी एका हंगामात घेतोय ९५ लाखांचे उत्पन्न

English
हिंदी सारांश
Web Title : Atpadi Kartik Yatra Sees ₹4 Crore Turnover; Somnath's Ram Wins

Web Summary : Atpadi's Kartik Yatra witnessed a ₹4 crore turnover in livestock trade. Somnath Jadhav's Ram was declared 'Hindkesari'. The event boosted the local economy, attracting farmers and traders from neighboring regions for livestock trading.
टॅग्स :शेळीपालनबाजारशेतकरीसांगलीकर्नाटकआंध्र प्रदेशपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती