Join us
Daily Top 2Weekly Top 5

Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:10 IST

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते.

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते.

शेतीकामासाठी बैल आणि दुधासाठी गाई-म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्व आहे, तर शेळी-मेंढी पालनसारखे जोडधंदे बळीराजाच्या उत्पन्नात भर घालतात. पावसाळ्यात जनावरे चरायला शेतात नेत असाल, तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणात प्राण्यांना शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात.

त्यामुळे गोठ्याची स्वच्छता, लसीकरण, जंतनाशक, औषधांचा वापर, चाऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन करून आपल्या जनावरांची पशूपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व हवा कशी येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

गोठा पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने धुवून कोरडा ठेवावा, गोठ्यातील जनावरांना एका ठिकाणी जास्त वेळ बांधू नका. गोठ्यातील शेण, मूत्र वारंवार बाजूला करा. पाऊस पडत असताना गोठ्याच्या बाजूला आडोसा करावा, त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येणार नाही.

त्यासाठी वेळीच काळजी घ्यावी. जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका. ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात, त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडून प्रसंगी जनावराच्या जिवावरही बेतू शकते.  त्यामुळे पशुखाद्य किंवा चारा कोरडा ठेवण्यासाठी दक्षता घेतल्यास पशुधन संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकते. 

जनावरांना पावसाळ्यात होणारे प्रमुख ७ आजार

बॅबेसिओसिस - एक पेशीय जंतूमुळे होतो व प्रसार पिसके चावल्यामुळे होतो. संकरीत जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.

घटसर्प - गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये होणारा संसर्गजन्य रोग.

फऱ्या - जनावरांमधील संसर्गजन्य रोग.

हगवण - गाई म्हशींना होतो.

पिपआर - शेळ्यांमधील विषाणूजन्य साथीचा रोग.

थायलेरिओसिस - हा रोग संकरीत जनावरांमध्ये व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पिसवे चावल्यामुळे होतो.

गोठा स्वच्छ ठेवावा

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. हे आजार विविध माध्यमांतून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यासाठी गोठा स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर पशुपालकांनी भर द्यावा. भिजलेला कुजलेला किंवा बुरशीयुक्त चारा खाऊ घातल्यानेसुद्धा जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे चारा साठवण्याचे नियोजन चोख करावे. शेतात येणारे नवीन गवत एकदाच खाऊ न घालता थोड्या-थोड्या प्रमाणात वाढवावे. - डॉ. मंगेश ढेरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, आष्टी जि. बीड. 

हेही वाचा - Goat Care In Rain पावसाळ्यात अशी घ्या शेळ्यांची काळजी; टळेल आर्थिक हानी

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेती क्षेत्रगायशेळीपालनदूधपाऊस