Join us

अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध कष्टी बैलबाजार तेजीत; 'या' जातीच्या बैलजोडीचा भाव गेला लाखात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:13 IST

Kashti Bail Bajar चारा आणि पेंडीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना पैलवान तयार करण्याहून अधिक खर्चिक बनले आहे.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा: चारा आणि पेंडीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना पैलवान तयार करण्याहून अधिक खर्चिक बनले आहे.

शेतीची मशागत आणि ऊस वाहतुकीसाठी बैलजोडीपेक्षा मिनी ट्रॅक्टर किफायतशीर ठरत आहे, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे बैलजोडीचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत. बैलजोडी केवळ छंद म्हणून पाळली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात काष्टी (ता. श्रीगोंदा) सर्वात मोठा बैल बाजार भरतो. या बाजारात दर शनिवारी ६०० ते ७०० बैलजोडी विक्रीसाठी येतात. यातून बाजारात मोठी उलाढाल होत असते.

शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यातच शेतीचे तुकडे झाल्याने एकर-दोन एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देऊ लागले आहेत.

शेतीच्या मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर आणि ऊस वाहतुकीसाठी जुगाड सिस्टीम सुरू झाली. त्यामुळे बैलजोडीचे महत्त्व कमी झाले आहे. त्यातच बैलजोडीचा खर्चही वाढला आहे.

येथे विक्रीस येणाऱ्या बैलजोडींना फक्त बेळगाव, निपाणी, धारवाड, सांगोलामधून मागणी आहे. पाच वर्षापूर्वी खिलार बैलजोडीचा भाव तीन लाखांपर्यत होता. तीच बैलजोडी दीड लाखात मिळत आहे.

तरीही शेतकरी, ऊस वाहतूकदार, मजूर, बैलजोडी खरेदी करीत नाहीत. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक का होईना बैलजोडी असायची. मात्र, आज बहुतांश शेतकऱ्यांकडे मिनी टॅक्टर दिसत आहेत.

पूर्वी बैलजोडी शेतकरी शेतीसाठी चांगले पैसे देऊन खरेदी करायचे. मात्र, आता शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी बाजारात येत नाहीत. थोडे फार कर्नाटक राज्यातील शेतकरी येतात. ते शेतीसाठी बैलजोडी नेतात. बैलजोडी विक्रीचे चांगले दिवस संपले आहेत. - सयाजीराव पाचपुते, बैल व्यापारी, काष्टी

उन्हाळ्यामुळे काष्टीत विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या काहीशी कमी झाली आहे. म्हशी सोडून इतर जनावरांना मागणी कमी आहे. पाऊस पडल्यानंतर समीकरण बदलेल, अशी आशा आहे. - राजेंद्र लगड, सचिव, बाजार समिती, श्रीगोंदा

मी नंबर वन खिलार बैलजोडी हौस म्हणून पाळण्यासाठी शनिवारी काष्टीच्या बाजारात १ लाख ३५ हजारांत खरेदी केली. शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. - पोपट गिरमे, शेतकरी, गिरीम, ता. दौंड

अधिक वाचा: केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीखरीपपीक व्यवस्थापनबैलगाडी शर्यतबाजारअहिल्यानगर