दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे ही प्राथमिक गरज आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणे हा योजनेचा मुख्य भाग आहे.
पशुधनास पुरेशा प्रमाणात पौष्टिक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पशुपालकांना चारा उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी सध्या अमंलबजावणी करण्यात येत असलेल्या वैरण व पशुखाद्य कार्यक्रम या कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ऐवजी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम सन २०२५-२६ पासून सन २०२८-२०२९ या कालावधीत राबविण्यास खालीलप्रमाणे मान्यता दिली आहे.
योजनेचे स्वरुपप्रति लाभार्थी १ हेक्टरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर रु. ४,०००/-(अक्षरी रु. चार हजार मात्र) च्या मर्यादेत वैरणींच्या बियाण्यांचा/ठोबांचा पुरवठा करण्यात येईल.
योजनेसाठी पात्रता१) ज्या लाभार्थ्यांकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशित केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वतःची किमान ३ ते ४ जनावरे आहेत, अशा लाभार्थ्यांस प्राधान्य.२) वैरण बियाण्यांचा पुरवठा करताना लाभार्थ्यांकडे उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक.३) वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते, जिवाणू संवर्धके शेतकऱ्याने स्वःखर्चाने खरेदी करणे आवश्यक.४) सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेण्यास पात्र.५) एका लाभार्थीस एका आर्थिक वर्षात एकदाच लाभ अनुज्ञेय.
योजनेची अमंलबजावणी कशी होणार?१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/जिल्हा पशुसवंर्धन उप आयुक्त लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवतील.२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/जिल्हा पशुसवंर्धन उप आयुक्त उपलब्ध निधीच्या अधीन राहून लाभार्थ्यांची निवड करतील.३) या कार्यक्रमांतर्गत ज्वारी, मका, बाजरी, बरसीम, लसूणघास, न्युट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर व इतर सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातीची ठोंबांचे वाटप करण्यात येतील.४) वैरणीची बियाणे व ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), इतर शासकीय संस्था, कृषि विद्यापिठे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, यांच्याकडून करण्यात यावी.५) वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे.६) वैरण बियाणे वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड करण्यात यावी.
अधिक वाचा: बायपास प्रोटीन अन् फॅट नेमके जनावरांच्या आहारात किती महत्त्वाचे आणि का? वाचा सविस्तर