नाशिक : कृषी पर्यटन केंद्रांना शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळते, ज्यामुळे बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होते आणि विविध योजनांचा लाभ घेता येतो. एकाच छताखाली पर्यटकांना वेगवगेळ्या गोष्टीचा आस्वाद देता येईल. अन् तुम्हालाही पर्यटकांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल.
कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेतीशी संबंधित व्यवसायांना पर्यटनाशी जोडणारी जागा होय, जिथे अभ्यागतांना शेतीमधील अनुभव, निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेता येतो, ज्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळते आणि पर्यटकांना शिक्षण व मनोरंजन मिळते. शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना राबवली जाते.
त्या अंतर्गत राज्य सरकारने कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी, मार्गदर्शन आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणे तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाने २००५ मध्ये कृषी-पर्यटन विकास महामंडळ (ATDC) स्थापन केले असून, ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे तसेच पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देणे यांसारख्या अनेक उद्दिष्टांना सरकारकडून पाठिंबा मिळतो.
नोंदणी कुठे, कशी करायची
कृषी पर्यटन केंद्र नोंदणीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर (maharashtratourism.gov.in) ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जासोबत ७/१२ उतारा, आधार कार्ड, वीज बिल, नोंदणी शुल्क आणि आवश्यक परवान्यांचे पुरावे जोडावे लागतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पर्यटन संचालनालयामार्फत छाननी केली जाते आणि आवश्यक असल्यास प्रमाणपत्र मिळते.
अनुदान, कर्ज अन्य सुविधा
कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र सरकार नोंदणीकृत पर्यटन केंद्रांना ३० टक्के अनुदान देऊ शकते तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि सहकारी बँकांकडून १० टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर नोंदणी केल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो.
निकष व कागदपत्रे
कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी किमान एक एकर शेतीयोग्य जमीन आवश्यक आहे. नोंदणीसाठी अर्जदाराकडे जमिनीची कागदपत्रे (७/१२ उतारा), आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वीज बिल यांसारखी कागदपत्रे असावी लागतात.
जिल्ह्यात ३५ कृषी पर्यटन केंद्रे
पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि कडक उन्हाळ्यात थंड हवेची अनुभूती नाशिकला मिळते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत असून ३५ केंद्रे झाली आहेत. २०२३ ला २७ केंद्रे होती. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक व निफाड तालुक्यात सर्वाधिक २१ केंद्रे आहेत. गंगापूर धरण परिसरात पाच ते सहा कृषी पर्यटन केंद्रे असल्याची माहिती निवृत्त कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी दिली.