Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:34 IST

कुसुंबा येथील शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अत्यंत सोपे झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील शेतकरी संशोधक गणेश काशिनाथ चौधरी (गणूदादा) यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या कामाच्या गतीत वाढ झाली असली तरी काही पद्धतींमध्ये अडचणी येत होत्या.

विशेषतः ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यानंतर पाट पाणी देण्यासाठी दांड टाकणे म्हणजेच पाण्यासाठी सरी तयार करणे हे एक मोठं आव्हान होतं. कारण यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडी किंवा मजुरांवर अवलंबून राहावं लागायचं ज्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च वाढत होता. शेतीतील या समस्येला लक्षात घेऊन गणूदादा यांनी जुगाड तंत्र विकसित केले आहे.

त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अत्यंत सोपे झाले आहे. हे कोळपे पांभरच्या मागे दोरखंडाच्या सहाय्याने जोडता येतात आणि त्याच्या मदतीने शेतकऱ्यांना बैलजोडी किंवा मजुरांची गरज भासत नाही. गणेश चौधरी यांचे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणारे असून यामुळे पाणी व्यवस्थापन अधिक सोपे आणि कार्यक्षम होईल.

दरम्यान प्रसिद्ध कांदा वाफा खाचे यंत्र, वाफा यंत्र, बेड रेझर, सॉईल रेझर अशा अनेक यंत्रांच्या निर्मितीसाठी गणेश चौधरी ओळखले जातात. त्यांच्या या आधुनिक आणि शेतकरी हिताच्या शोधांमुळे शेतकऱ्यांच्या कामाची गती वाढली असून, उत्पादन खर्चात घट झाल्याचे दिसून आले आहे.

गणेश चौधरी यांचे कार्य "गरज हीच शोधाची जननी आहे" या सिद्धांतावर आधारित आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगांची दखल राज्य सरकारने देखील घेतली असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यभर त्यांच्या संशोधनाची चर्चाही होत असते. 

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's ingenious invention simplifies furrow creation after tractor sowing.

Web Summary : Maharashtra farmer Ganesh Choudhari invented a simple, cost-effective tool. Attached to tractors, it creates furrows post-sowing, saving time, labor, and costs. This innovative solution streamlines water management, improving efficiency and reducing farmer's burden. Choudhari's work exemplifies practical problem-solving in agriculture.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनलागवड, मशागतधुळे