महेश घोलपगेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढू लागला आहे. मात्र, त्याचे उत्पादन कमी निघत आहे. शिवाय त्याचे शेतातील उत्पन्नदेखील घटले आहे.
परिणामी खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्याला आर्थिक खर्चाची हात मिळविणी करताना अक्षरशः दिवसा चांदण्या दिसू लागले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कमी खर्चात, जास्त उत्पन्न घेण्यासाठी शक्कल लढवली आहे पाहावयास मिळत आहे.
कांदा लागवड ट्रॅक्टरच्या साह्याने प्लॅनटूमेट सहा सीट मशीनद्वारे करत आहेत. ६ सीट मशीनने एका दिवसात एक एकर लागवड होते. १ एकर कांदा लावण्यासाठी ६ मजूर आणि १ ड्रायव्हर पुरेसे होतो, योग्य खोलीवर आणि ४.५-५ इंचावर योग्य अंतरावर लागवड केली जाते.
एकरी दोन लाख ३५ हजार रोप लागते. २५ टन कांदा उत्पादन प्रति एकर घेता येईल. आपल्याला पारंपरिक पद्धतीने वाफे तयार करणे, भिजवणे परत पाणी देऊन लागवड करणे यासाठी जे मजूर लागतात ते लागत नाहीत.
मशीनद्वारे वाफे किंवा बेड बनवून लागवड आदी सर्व कामे एकाच वेळी करता येतात, रात्रीच्या वेळीदेखील ही लागवड करता येणे शक्य आहे. प्रती एकर लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा निम्मा खर्च येतो.
लागवड झाल्यावर पाट पाणी सारे पद्धतीने, तसेच बेड पद्धतीने लागवड असल्यास ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन, स्प्रिंकलर पद्धतीनेदेखील देता येते. लागवड करण्यापूर्वी बेसल डोस म्हणून प्रति एकर २४.२४.०० बॅग प्रति एकर आणि खुरपणी करून १०.२६.२६ प्रति एकर दोन बॅग मी देतो.
करपा नियंत्रण करण्यासाठी स्पर्शजन्य रोगनाशके आणि मावा किडींच्या नियंत्रण करण्यासाठी कीडनाशके वापरली जातात. पारंपरिक पद्धतीपेक्षा रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव २५ टक्के कमी होतो.
कांद्याचे दर्जेदार उत्पन्न मिळते. कांदा काढणीसुद्धा लवकर होते. मी गेले तीन वर्ष या पद्धतीने कांदा लागवड करत आहे, असे प्रगतिशील शेतकरी अजित घोलप यांनी सांगितले.
शेतकऱ्याला आधुनिक शेतीचा पर्याय- रासायनिक खताच्या दरात खत कंपन्यांनी भरमसाट आणि मनमानीपणे दरवाढ केली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या अर्थकारणावर निश्चितपणे होऊ लागला आहे.- सर्वाधिक फटका हा शेती मशागतीचे वर महाग होण्यावर झाला आहे. नांगरणी, खुरपणी, रोटर करणे, सरी मारणे यांचे दर वाढल्याने शेतीची मशागतदेखील शेतकऱ्यांसाठी महाग होऊ लागली आहे.- खरीप पिकाच्या तोंडावर नेमके खत, बी-बियाणे घेऊन शेती करायची कशी? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.- परंतु, आधुनिक शेती करून या गोष्टीचा पर्याय मिळू शकतो कारण भांडवल कमी लागते आणि उत्पन्न जास्त मिळते. त्यामुळे शेतकऱ्याने हा पर्याय अवलंबणे गरजेचे आहे, असे प्रगतिशील शेतकरी बोलत आहेत.
अधिक वाचा: Us Sheti : परवडत नाही, म्हणून ऊसशेती कशी सोडणार? काय म्हणता आहेत तज्ञ, वाचा सविस्तर