कोल्ड प्रेस पद्धतीवर ही तेल काढण्याची पद्धत अत्यंत जुनी असून आपल्या पूर्वजांनी या पद्धतीचा वापर केला आहे. ही पद्धत म्हणजे बैलाच्या सहाय्याने तेल काढण्याची पारंपरिक पद्धत.
सध्या यामध्ये बैलाऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जातो. कोल्ड प्रेस, कोल्हु का तेल किंवा घाण्याचे तेल असा उल्लेख केला जातो. म्हणजे असे तेल ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन, पेट्रोकेमिकल्स आणि गमचा वापर न करता स्वच्छ प्रक्रिया केली जाते.
कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय?
मागील काही दिवसात लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे आहारातील पोषणमूल्यांची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये तेलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण ते आपल्या रोजच्या आहारात वापरले जाते. तेलाच्या प्रकारानुसार त्याचे पोषणमूल्य, आरोग्यावर परिणाम आणि शरीरासाठी लाभवेगवेगळे असतात. सध्या बाजारात दोन प्रमुख प्रकारचे तेल उपलब्ध आहेत कोल्ड प्रेस तेल आणि रिफाइन्ड तेल. यापैकी कोणते तेल अधिक पोषक व आरोग्यदायी आहे, याचा विचार आपण करू या.
कोल्ड प्रेस तेल म्हणजे काय?
कोल्ड प्रेस तेल म्हणजे पारंपरिक पद्धतीने, कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर न करता, कडधान्ये, बिया किंवा फळांपासून थेट तेल काढलेले असते. या प्रक्रियेत कमी तापमानावर बिया किंवा कडधान्यांना दाब दिला जातो, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक घटक, सुगंध, रंग आणि पोषक तत्वे सुरक्षित राहतात. कोल्ड प्रेस तेल हे शुद्ध, नैसर्गिक आणि पोषक तेलाचे स्वरूप आहे.
रिफाइन्ड तेल म्हणजे काय?
रिफाइन्ड तेल हे विविध रासायनिक प्रक्रिया, उच्च तापमान आणि यांत्रिक प्रक्रियेने तयार केलेले असते. बिया किंवा कडधान्ये यांच्यावर अनेक पातळ्यांवर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत तेलाचे रासायनिक गुणधर्म बदलतात. तसेच तेल स्वच्छ, हलके आणि आकर्षक दिसते, परंतु त्याच वेळी त्यातील नैसर्गिक पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स, आणि आवश्यक फॅटी अॅसिड्स (स्निम्धाम्ले) नष्ट होतात.
पोषणतत्वांच्या बाबतीत कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेलाची तुलना
कोल्ड प्रेस तेल | रिफाइन्ड तेल | |
अँटीऑक्सिडंट्स | नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. | रिफाइन्ड प्रक्रियेत हे अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात. |
जीवनसत्वे | नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले व्हिटॅमिन ए, ई आणि के अबाधित राहतात. | रिफाइन्ड प्रक्रियेत ही व्हिटॅमिन्स नष्ट होतात. |
ओमेगा फॅटी अॅसिड्स | ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण चांगले असते. | तेलात उच्च तापमानामुळे हे फॅटी अॅसिड्स कमी होतात. |
गंध आणि रंग | तेलास नैसर्गिक सुगंध आणि रंग असतो. | नैसर्गिक गंध आणि रंग नष्ट होतो आणि त्यात कृत्रिम घटकांचा वापर होतो. |
आरोग्यावर परिणाम
१) हृदयविकाराचा धोका कमी
कोल्ड प्रेस तेलात उपलब्ध असलेले ओमेगा फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड्स हृदयविकाराचा धोका कमी करतात. रिफाइन्ड तेलामध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्स आणि कृत्रिम घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कोल्ड प्रेस तेलात कोणत्याही रसायनांचा वापर होत नसल्यामुळे त्यात विषारी घटक नसतात. रिफाइन्ड तेलात रसायनांचा वापर करून त्याचे शुद्धीकरण केले जाते, ज्यामुळे त्यात काही प्रमाणात विषारी घटक राहतात.
२) रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
कोल्ड प्रेस तेलातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. कोल्ड प्रेस तेल हे पोषणदृष्ट्या अधिक लाभदायक आणि आरोग्यवर्धक आहे. त्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले घटक शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात. रिफाइन्ड तेल बनविताना केलेल्या विविध प्रक्रिया या पोषक घटकांचा नाश करतात. त्यामुळे आपल्या आहारात रिफाइन्ड तेलाऐवजी कोल्ड प्रेस तेलाचा समावेश केल्यास हे शरीरासाठी अधिक उपयुक्त ठरते.
- श्री. अमोल चिद्रावार
राज्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, कृषी आयुक्तालय, पुणे