नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत उसाला प्रतिटन किमान ३ हजार ४०० रुपये भाव मिळत नाही, तोपर्यंत पंचक्रोशीत ऊस तोडणी करू देणार नाही, असा सर्वानुमते ठराव मांडण्यात आला.
प्रकाशा गावातील गढी परिसरात पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत शेतकऱ्यांनी एकमताने ठराव केला की, जोपर्यंत प्रतिटन ३ हजार ४०० रुपये भाव कारखानदार जाहीर करत नाही. तोपर्यंत प्रकाशा परिसरात ऊस तोडणी होऊ देणार नाही., असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
शेतीपयोगी सर्वच वस्तू आणि खतांचे दर वाढले
ऊस लावणी करताना मजुरी, उसाचे बियाणे, युरिया, फॉस्फरस, रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. लाखो रुपये खर्च करून आस्मानी आणि सुलतानी संकटाशी दोन हात करत आहेत. सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने शेती न परवडण्यासारखी झाली आहे. शेतकरी काबाडकष्ट करून पीक लागवड करतो. परंतु योग्य भाव मिळत नाही.
प्रशासनाकडे बैठकीत मंजूर ठरावाची प्रत केली सादर
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या ठरावावर प्रकाशा पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांनी सह्या केल्या असून, त्याबाबतचे पत्र शहादा तहसीलदार, उपजिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना देण्यात आले.
कारखान्यात गाळप हंगामाला सुरुवात
प्रकाशा परिसरातील सर्वच कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू झाला असून, साखर कारखान्यांचे बॉयलर पेटू लागले आहेत. मात्र, उसाचा दर अद्याप निश्चित केला नाही. दरवेळी साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. दर निश्चित करण्याबाबत खारखानदारांनी योग्य भूमिका घ्यावी, असा सूर बैठकीत उमटला.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस तोडणी केली नाही, तर काही लोक सूडबुद्धीने उसाला आग लावून देतात. जेणेकरून जळालेला ऊस शेतकरी कारखान्यावर देतील. अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात यावी, अशी चर्चा करण्यात आली. अगर अशी घटना घडल्यास याला जबाबदार कारखाने राहतील, असेदेखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
