Agriculture News : पंचगंगा साखर कारखान्याने शेतकऱ्यांवर १० कोटींची मानहानी नोटीस मागे घेऊन नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत द्विपक्षीय करार करूनच उसाला कोयता लावावा, अन्यथा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पंचगंगाला कोयता लाऊ देणार नाही, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाकडून देण्यात आला आहे.
पंचगंगा साखर कारखाना, महालगाव व्यवस्थापनाने मागचे वर्षी गाळपला ३ हजार रुपये प्रति टन भाव देण्याचे कबूल केले. त्यातले २८५० रुपये दिले. यातील १५० रुपये बाकी होते. हेच राहिलेले पैसे कधी देणार आणि चालू हंगामाचा भाव काय देणार हे विचारण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागमठान येथील शेतकरी गणेश तांबे आणि इतर ऊस उत्पादक शेतकरी हे पंचगंगा साखर कारखाना व्यवस्थापनाने गेले होते.
हा गुन्हा आहे का?
यावेळी कारखाना व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कार्यालयात प्रवेश करण्याआधी सर्व शेतकऱ्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले. तसेच भाव विचारायला गेलेल्या संबंधित शेतकऱ्यांवर तब्बल १० कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली. शेतकऱ्याने कारखानदारला ऊसाचे शिल्लक पैसे आणि पुढील हंगाम भाव मागणे हा गुन्हा आहे का? यात कारखानदाराची कोणती बदनामी होते? असे सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहे.
दडपशाही चालू देणार नाही
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर यांच्या माध्यमातून पंचगंगाची ही दडपशाही चालून देणार नाही. पंचगंगा साखर कारखान्याने मागचे गळीत हंगाम वेळी श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पण ऊस गाळपासाठी नेलेला आहे. तेव्हा पण पंचगंगाचे कर्मचारी नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रति टन प्रमाणे पैसे देणार असल्याचे सांगत होते, ऊस तोड करत होते.
तरच उसाला कोयता लावावा
दरम्यान नगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे देखील १५० रुपये प्रति टन प्रमाणे पैसे घेणे आहेत. त्यामुळे पंचगंगाने चालू हंगामात ऊस तोडणीसाठी कोयता लावण्याअगोदर शेतकरी गणेश तांबे यांना बजावलेली नोटीस तत्काळ मागे घ्यावी आणि नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत ऊसाचे द्विपक्षीय करार करावेत, त्यासाठी आधी द्विपक्षीय करार करूनच उसाला कोयता लावावा अशी मागणी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाकडून संयुक्त पत्रकाद्वारे कारखाना व्यवस्थापनाला केली आहे.
ऊसाचे मागील हंगामाचे शिल्लक पैसे आणि चालू हंगामाचा भावाची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर जर पंचगंगाचे साखर उद्योजक १० कोटींची मानहानी नोटीस पाठवीत असतील तर शेतकरी संघटना साखर उद्योजकांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी कटिबध्द आहे. पंचगंगा कारखान्याच्या मालकांनी तत्काळ १० कोटींची मानहानी नोटीस मागे घेऊन नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी द्विपक्षीय करार करावेत तरच पंचगंगाला नगर जिल्ह्यातील उसाला कोयता लाऊ दिला .
- नीलेश शेडगे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर