Jaggery Powder : ऊस उत्पादनाबरोबर पूरक व्यवसाय म्हणून गूळनिर्मितीचे सुधारित तंत्र अवलंबल्यास गुळाबरोबर काकवी व गूळ पावडर यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर निश्चितच शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळून नफा वाढेल.
गुळ पावडर प्रक्रिया
- गुळापासून तयार केलेल्या पावडरचा (भुकटी) रंग विशिष्ट गुणधर्मामुळे गुळापेक्षा अधिक उठावदार असतो.
- गूळ पावडरमध्ये ओलाव्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने साठवणक्षमता चांगली असते.
- गूळ पावडर तयार करावयाची असल्यास गूळ साच्यात न भरता वाफ्यातच थंड होऊ द्यावा.
- गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच दाताळ्याने उभ्या व आडव्या रेघा मारून गूळ हलवून घेऊन लहान लहान तुकडे करावेत.
- हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेऊन वाळवावेत.
- वाळलेला गूळ लाकडी बडवण्याने बारीक करावा.
- बारीक केलेला गूळ वेगवेगळ्या चाळणीतून चाळून घेऊन दोन तीन दिवस वाळवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी करावे.
- पावडरीचे वर्गवारीनुसार पॉलीथीनच्या आकर्षक पिशव्यांतून पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावे.
गुळ पावडरीच्या किमती
250 ग्रॅम : सुमारे 55 रुपये
500 ग्रॅम : 52 ते 95 रुपयापर्यंत
1 किलो : सुमारे 190 किंवा त्याहून अधिक (सेंद्रिय, नॉन ऑरगॅनिक, ब्रँडनुसार)
(किंमतीमध्ये त्या त्या परिसरानुसार, व्हरायटीनुसार बदल होऊ शकतात. )
- प्रा. एस. एस. प्रचंड, डॉ. डी. आर. निकम, डॉ. व्ही एन. गमे,
सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी हुलाजी सिताराम पाटील, कृषी महाविद्यालय, नाशिक
