पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी राज्यातील आणखी 25 ते 30 टक्के साखर कारखान्याचे गाळप अद्याप सुरू झालेले नाही. तर साखर आयुक्तालयातून आलेल्या आकडेवारीनुसार 80 सहकारी आणि 70 खाजगी साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे.
दरम्यान, यंदा जवळपास 215 साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे अजून काही साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळालेले नाहीत तर काही साखर कारखान्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. त्यापैकी 150 कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर पासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होणार होता. परंतु, काही साखर कारखान्यांनी या आधीच गाळप सुरू केल्याने 6 साखर कारखान्यांवर आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आली होती.
आत्तापर्यंत सुरू झालेल्या साखर गाळप हंगामात एक कोटी 25 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर 93 लाख 93 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यासोबतच निव्वळ साखर उताऱ्यामध्ये मोठी घट दिसून आली असून केवळ 7.47% एवढाच उतारा आला आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. मातीमध्येही होल असल्यामुळे साखर उतारा कमी आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शतकांचे नुकसान झाले असून याचा परिणाम ऊस क्षेत्रावरही झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पण अतिवृष्टीचा परिणाम साखर उत्पादनावर होईल का या संदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे.
साखरा आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, काही साखर कारखान्यांच्या गाळप परवाना अर्जामध्ये त्रुटी आढळल्या असल्यामुळे ते अर्ज परत पाठवण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर सदर साखर कारखान्यांना गाळप परवाने अदा करण्यात येतील. त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळपाला सुरुवात होईल अशी माहिती आहे.
