धुळे : साक्री तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेला पांझराकान (Panzarakan Sugar Factory) सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित आणि शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी दिली.
१९७१ साली सुरू झालेला आणि २००२ मध्ये बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्यासाठी सुरू असलेल्या अथक प्रयत्नांना नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर यश आले आहे. २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि शिखर बँकेला पत्र देऊन कारखाना सुरू करण्याची विनंती केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय स्तरावर कारखान्याच्या कागदपत्रांची हालचाल सुरू झाली.
उद्योजक बबनराव गायकवाडांकडून कारभार
हा कारखाना रावळगाव साखर कारखाण्याचे चेअरमन बबनराव गायकवाड यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, भाडणे गावाचे सरपंच अजय सोनोने यांनी कारखाना सुरु होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कारखाना हस्तांतरणची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, ९ ऑक्टोबर रोजी बबनराव गायकवाड यांना हस्तांतरित करण्यात येईल त्यानंतर मशिनरीची पाहणी करून कारखाना सुरु करण्याची कार्यवाही होईल.
उपमुख्यमंत्री पवारांच्या बैठकीत निर्णायक आदेश
उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत २५ जून रोजी झालेल्या बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप बनकर, डॉ. गावित यांच्यासह उपस्थित होते.