Farmer Success Story : सांगलीच्या विजय रंगराव शिंदे यांच्या सोललेल्या लसूणविक्री व्यवसायाने भरारी घेतली आहे. त्याला कारणीभूत आहे, त्यांचा ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, या उक्तीवर असलेला ठाम विश्वास. प्रयत्न करणाऱ्याला हमखास यश येते, त्याप्रमाणे त्यांनाही आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मदत मिळाली. आज ते सांगली, कोल्हापुरातील उपहारगृहांना सोललेला लसूण पुरवतात.
विजय शिंदे पूर्वी कल्याण (ठाणे) येथे खासगी नोकरी करत होते. सांगलीमध्ये राहायला आल्यानंतर काय करावे हा प्रश्न त्यांना सतावत होता. नोकरी शोधण्याचे वयही नव्हते. तेव्हा 2018 मध्ये त्यांनी लसूण सोलण्याचा व्यवसाय सुरू केला. 10 किलो लसूण बाजारातून आणला, तो हाताने फोडून, सोलून हॉटेलमध्ये विक्रीसाठी घेऊन गेले. तिथे पहिलीच ऑर्डर 50 किलोची भेटली. पहिल्याच प्रयत्नाला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा उत्साह दुणावला. यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील व्यवसायवृद्धीचा पाया पहिल्याच ऑर्डरमध्ये रचला गेला.
महामंडळाचे कर्ज कसं मिळालं?
विजय शिंदे यांच्या डोळ्यात स्वप्न होते. पण हातात भांडवल नव्हते. त्यामुळे प्रारंभिक प्रयत्नांमध्ये बाजारातून लसूण आणून हाताने फोडून व सोलून मग त्याची विक्री केली जायची. त्यानंतर त्यांनी छोटी मशीन घेऊन पाण्याने सोललेला लसूण विक्री केली. यादरम्यान सोललेला लसूण पुरवठा करण्यास गेले असता, एका हॉटेलमध्ये विजय शिंदे यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पत्रक भेटले.
त्यांनी तात्काळ महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियातून कर्जाचा प्रस्ताव सादर केला. योजनेची माहिती देण्याबरोबरच कर्जप्रस्ताव सादर करण्यासाठी मार्गदर्शन व कर्जमंजुरीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महामंडळाने केले.
कशी प्रक्रिया केली जाते?
याबाबत विजय शिंदे सांगतात, मी सहा वर्षांपूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेतून सेंट्रल बँक ऑफ इंडियात सात लाखांचा कर्ज प्रस्ताव सादर केला. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यातून मी लसूण सोलण्यासाठी आवश्यक तीन यंत्रांची खरेदी केली. त्यासाठी जवळपास 9 ते 10 लाख रूपये खर्च आला. या तीन यंत्रांच्या माध्यमातून लसणाच्या गड्ड्यापासून लसूण पाकळ्या करणे, या पाकळ्यांचे मोठ्या, मध्यम व लहान असे वर्गीकरण करणे, लसूण पाकळ्यांची सालं काढणे व सोललेला लसूण तयार करणे ही कामे होतात, असे त्यांनी सांगितले.
विक्री व्यवस्था कशी आहे?
विजय शिंदे म्हणाले, कर्ज मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या व्यवसायास सुरुवात झाली. व्हीआरएस एंटरप्रायझेस या नावाने मी व्यवसाय सुरू केला. हा लसूण मी मध्य प्रदेश, गुजरातमधून खरेदी करतो. आज माझ्याकडे 11 महिला व 1 पुरूष कामगार आहेत. सहा वर्षांपूर्वी 10 किलो सोललेल्या लसूणविक्रीपासून सुरू झालेला माझा व्यवसाय आज महिन्याला 10 टन लसणापर्यंत येऊन पोहोचला आहे.
मी रोजचा 150 ते 200 किलो लसूण विक्री करतो. सांगली, कोल्हापूर, तासगाव, शिरोळ येथील विविध नामांकित हॉटेलमध्ये हा सोललेला लसूण पुरवठा केला जातो. व्यवसाय सुरू करण्याच्या विजय शिंदे यांच्या स्वप्नांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामुळे पंख लाभले. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह महामंडळ्याच्या सांगली जिल्हा समन्वयक निशा पाटील व त्यांच्या टीमचे व राज्य शासनाचे आभार व्यक्त करतात.
- संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली