नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेला पिंपळगाव निपाणी येथील साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. येथील उद्योजक व वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर यांनी ग्रेनाँच इंडस्ट्रिजच्या माध्यमातून केजीस शुगर अँड इंफ्रा कार्पोरेशन लिमिटेड हा कारखाना एनसीएलटी व बँकेकडून खरेदी केला आहे.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे. संजय होळकर व सोनिया होळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४०० कोटींची उलाढाल होईल आणि सुमारे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
दररोज ३,५०० मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता या कारखान्याकडे आहे. सद्यस्थितीत गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू असून आतापर्यंत तब्बल ४,६०० हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे.
या पत्रकार परिषदेला संचालक सत्यजित होळकर, धनंजय थिटे, सुरेंद्र सनस, प्रकाश दायमा, कार्यकारी संचालक आदित्य होळकर, अजयकुमार खैरनार, सुकदेव शेटे, माधवराव घोरपडे, निरंजन होळकर वसंतराव शिंदे, राजेंद्र देसले, मुश्ताक पटेल व कर्मचारी वृंद उपस्थित होते.