काजूगरापासून विविध प्रक्रिया उत्पादने जसे काजू कतली, काजू मोदक, काजू पेस्ट, काजू हलवा, काजू चॉकलेट इ. तयार केले जातात. या पदार्थांना चांगली मागणी असून हे पदार्थ जास्त नफा मिळवून देणारे आहेत.
चॉकलेट काजू उत्पादन हा सद्यस्थितीत जास्त नफा देणारा आणि लोकप्रिय व्यवसाय आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया.
अ) चॉकलेट काजू उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल
उच्च दर्जाचे काजू निवडावेत (किंमत रु. ६०० ते १,२०० प्रति किलो), चॉकलेट कंपाउंड (मिल्क/डार्क) (साधारण रु. २०० ते रु. ५०० प्रति किलो), फ्लेवरसाठी लागणारे घटक मीठ, साखर आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, कोको पावडर किंवा चॉकलेट फ्लेवर विशेषतः डार्क चॉकलेटसाठी कंफेक्शनर्स ग्लेज (शायनिंग) चॉकलेटला चमकदार करण्यासाठी वापरले जाते.
ब) प्रक्रिया
■ काजू भाजणे काजूंना हलके भाजून ताजेपणा आणावा.
■ चॉकलेट वितळवणे चॉकलेट कंपाउंड वितळवण्यासाठी डबल बॉयलर वापरून साधारण ४५-५० अंश सेल्सिअस तापमान ठेवावे.
■ काजूला चॉकलेटचे आवरण देणे वितळलेल्या चॉकलेटमध्ये भाजलेले काजू बुडवून योग्य प्रकारे आवरण करावेत.
■ कोटेड काजू थंड करणे आवरण केलेले काजू थंड होण्यासाठी ठेवावेत किंवा थंड कॅबिनेटमध्ये साठवावेत.
■ शायनिंग एजंट लावणे (Capol) काजूंवर शायनिंग एजंट लावल्यास त्यांना आकर्षक चमक येते.
क) मशिनरी, क्षमता आणि किंमती
व्यवसायाच्या व्यापकतेवर अवलंबून काही इतर मशीन आवश्यक असू शकतात.
१) काजू रोस्टर (क्षमता १०-५० किलो प्रति तास, किंमत रु. ५०,०००/- ते १,५०,०००/-रु.)
२) चॉकलेट मेल्टिंग मशीन (डबल बॉयलर - क्षमता ५-२० किलो प्रति तास, किंमत रु. ५०,०००/- ते १,५०,०००/-)
३) कोटिंग मशीन (ड्रम कोटर क्षमता २०-३० किलो प्रति तास किंमत रु. १,००,०००/- ते रु. ३,००,०००/-)
४) कूलिंग कॅबिनेट (क्षमता १०-५० किलो, किंमत रु. ५०,०००/- ते १,००,०००/-रु.)
या मशीनचे खर्च मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी विचारात घेतले जातात. त्यामुळे लहान व्यवसायासाठी यापैकी काही टप्पे पारंपारिक पद्धतीनेही करता येऊ शकतात.
ड) अर्थशास्त्र
कच्चा माल खर्चः प्रति किलो रु. ८०० ते १,५०० (काजू, चॉकलेट, इतर सामग्रीसह), प्रक्रिया आणि पॅकेजिंग खर्च प्रति किलो साधारण रु. १५० ते ३०० येतो. साधारणतः काजू चॉकलेटमध्ये ३०% काजू वापरून त्यावर ७०% चॉकलेटचे आवरण दिले जाते.
यानुसार काजू चॉकलेट प्रक्रियेचा प्रति किलो सरासरी दर रु. ६००/- ते ८००/- येतो. बाजारात चॉकलेट काजूची विक्री किंमत साधारण रु. २,०००/- ते ३,०००/- प्रति किलो आहे.
त्यामुळे चॉकलेट काजू व्यवसायामध्ये २०-२५% नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी योग्य मार्केटिंग आणि उच्च दर्जाच्या पॅकेजिंगमुळे चॉकलेट काजूला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काजू प्रक्रिया उद्योगासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे फायदा मिळवू शकतो. यामध्ये कमी प्रारंभिक भांडवल असल्यास मॅन्युअल मशिनरी वापरून प्रक्रिया उद्योग सुरू करता येईल.
यात गुंतवणूक सुमारे रु. ३,००,০০০/- ते रु. १०,००,०००/- दरम्यान असू शकते. तसेच, स्वयंचलित मशीनरीसाठी गुंतवणूक रु. १०,००,०००/- ते रु. २५,००,०००/- दरम्यान असू शकते, जे दीर्घकालीन व्यवसायाच्या कार्यक्षमतेत सुधारणा आणते आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करते.
अशाप्रकारे आधुनिक यंत्राद्वारे काजू बियांवर प्रक्रिया करून काजूचे अखंड गराचे प्रमाण अधिक मिळत असल्याने काजू प्रक्रिया उद्योग फायद्याचा ठरत आहे.
अधिक वाचा: Shevga Powder Business : शेवग्यापासून पावडर बनविणे प्रक्रिया व्यवसायात कशा आहेत संधी? वाचा सविस्तर