मुंबईत शिवडी रेल्वे क्रॉसजवळ रस्ता खचला, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:57 PM2021-07-18T20:57:24+5:302021-07-18T21:08:03+5:30

मुंबई शहर आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. यात विविध ठिकाणी दरड कोसळून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला. शिवडी येथेही आता रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे शिवडी येथे रेल्वे क्रॉसजवळ रस्ता खचला आहे. रस्त्याला पडलेल्या भेगांमध्ये एक टेम्पो देखील अडकला. (फोटो: सुशील कदम)

सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी रहदारीचा मुख्य रस्ता असल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (फोटो: सुशील कदम)

महानगरपालिकेनं घटनेची दखल घेऊन संबंधित परिसर रहदारीसाठी बंद केला आहे. तर क्रेनच्या माध्यमातून अडकलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला आहे. (फोटो: सुशील कदम)

शिवडीचा रेल्वे क्रॉस परिसर दाटीवाटीचा असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्ता खचण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (फोटो: सुशील कदम

मुंबईत मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत असून चेंबुर येथे वाशीनाका परिसरात मोठी दुर्घटना घडली. दरडकोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांना जीव गमावावा लागला. (फोटो: सुशील कदम)

चेंबूर येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना राज्य सरकारनं प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर केंद्राकडूनही प्रत्येकी २ लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. (फोटो: सुशील कदम)

विक्रोळीतही अशाच प्रकारची घटना घडली. मुसळधार पावसामुळे दरड घरांवर कोसळली आणि यात ७ जणांचा मृत्यू झाला. तर भांडूपमध्येही घरावर दरड कोसळल्यानं एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.