'ही दोस्ती तुटायची नाय'; उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात, रश्मी वहिनींनी केलं औक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 04:41 PM2022-11-10T16:41:52+5:302022-11-10T16:54:18+5:30

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 10३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले.

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 10३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले.

जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी सर्वप्रथम सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर, शिवतिर्थवर जाऊन स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

तत्पूर्वी मातोश्रीवर जाताच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी गळाभेट घेतली. यावेळी, रश्मी ठाकरेंनी संजय राऊत यांचे औक्षण केले. तर, आदित्य ठाकरेंनी जादू की झप्पी दिल्याचं पाहायला मिळालं.

मातोश्रीवर पोहोचल्यानंतर संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसून येत होता. तेथे त्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीला पाहून नमस्कार केला. तर, उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवत एकप्रकारे ही दोस्ती तुटायची नाय, असंच सांगितलं आहे.

'कालचा निर्णय म्हणजे, त्यांच्यासाठी मोठा दणका आहे. पण आता खोट्या केसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाबरुन जे पक्षातून पळून गेले, त्यांच्यासाठीही हा मोठा धडा आहे, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.

तोफ तोफच असते, ही मैदानात आणण्याची गरज नसते. संजय आमची लांब पल्ल्याची तोफ आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचं कौतुक केलं. तसेच, संजय राऊत माझा मित्र आहे, आमचं कौटुंबिक नातं आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही संजय, सुनिल, आई, वहिनी आणि मुलींचही कौतुक करेल. त्यांनीही मोठा लढा दिला आहे. मी मधल्या काळात भावूक झालो होतो, त्याला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. हा खडतर काळ त्याच्यासाठी होता, तसाच आमच्यासाठीही होता,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, 'शिवसेना एकच आहे, हा गट आणि तो गट नाही. शिवसेना एकच, ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आम्ही राजकीय लढाई लढू. मी फडणवीसांना भेटणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज्याचे काही प्रश्न आहेत. त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातीलकाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. त्यांना भेटण्यात काही गैर नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, पक्षाचे नाही,'

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून शिवसेना नेत्यांनाही बळ मिळालं आहे