भाडं नाकारणं आता रिक्षा-टॅक्सी चालकांना महागात पडणार, पोलिसांचा आदेश आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:24 PM2022-10-17T21:24:48+5:302022-10-17T21:30:36+5:30

Mumbai Auto And Taxi : मुंबई शहरात टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून भाडे नाकारलं जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. तुम्हालाही याचा अनुभव आलाच असेल. रात्री-बेरात्री भाडं नाकारलं जाणं असो किंवा मग जवळचं भाडं नाकारणं असो यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागतं.

एकतर रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडं नाकारलं तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचं असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. प्रवाशांच्या याच तक्रारींची आता पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला आता चाप बसणार असून अशा मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालक अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. या बद्दलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

भाडं नाकारल्यास कारवाई करण्याबाबतचे फलक रेल्वे आणि बस स्थानकाबाहेर लावण्यात आले आहेत. भाडे नाकारण्याची तक्रार आल्यात संबंधितावर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे, असं पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

तसेच आपल्या विभागातील सर्व टॅक्सी आणि रिक्षा चालकांची एक बैठक बोलावून याबद्दलची माहिती देण्यात यावी असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. जर भाडे नाकारण्याची तक्रार आलीच तर संबंधितावर मोटार वाहन कायदा 178 (3) (MVA section 178 (3)) अन्वये कारवाई करण्यात यावी असे आदेशही पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

आता मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर तरी भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या वर्तनात सुधारणा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.