Mumbai Local: उद्यापासून जवळच्या रेल्वे स्थानकावर मिळणार लोकलसाठी पास; जाणून घ्या अटी, शर्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:54 PM2021-08-10T19:54:51+5:302021-08-10T20:22:20+5:30

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्यापासून (११ ऑगस्ट) सुरु होणार आहे.

ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अ‍ॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी उद्यापासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन चहल यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक ३५८ मदत कक्ष असतील. मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण १०९ लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.

नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक असणार आहे.

मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट –दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.

सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या संपूर्ण प्रक्रियेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) देखील नेमले असून त्यांच्यासह आवश्यक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना १५ ऑगस्ट पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.