"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:36 AM2024-02-26T08:36:41+5:302024-02-26T08:55:11+5:30

विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल, असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

"will come up with a blueprint for development"; Ajit Pawar's emotional letter to the people of maharashtra | "विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, आपल्या राजकीय प्रवासाचा इतिहास सांगताना, मी केवळ विकास आणि कामांना महत्त्व देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्याचं काम अजित पवार यांनी या पत्रातून केलं आहे. तसेच, विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल, असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या बाबत केलेला हा पत्रप्रपंच, असल्याचं अजित पवार यांनी पत्राच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. मात्र, आजच त्यांनी हे पत्र लिहण्याचे कारण काय, असा सवालही अनेकांना पडला आहे. 

''सन १९९१ पासून मी राजकीय जीवनात ख-या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वताःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावरच कायम माझा भर राहिला'', असे अजित पवार यांनी म्हटले. 

विकासालाच सर्वाधिक प्राधान्य

पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वताःला लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केल, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहका-यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.

विचारधारेशी तडजोड नाही

विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल. कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.

मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला, कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्विकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे. वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मुलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. 

दरम्यान, या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल, इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद द्यावा, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. 

Read in English

Web Title: "will come up with a blueprint for development"; Ajit Pawar's emotional letter to the people of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.