...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:28 PM2024-03-25T17:28:23+5:302024-03-25T17:30:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सोलापूरमध्ये पीएम आवास योजनेतील १५,००० घरांचे वाटप भव्य कार्यक्रमातून करण्यात आले होते

... while Adam Master will campaign for praniti Shinde of Congress; For whom PM Modi came to Solapur | ...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

मुंबई - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर, भाजपानेही युवा आमदार लोकसभेच्या रणांगणात उतरवला आहे. आमदार राम सातपुते यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदारांमध्ये रंगतदार लढत होणार आहे. तर, देशाच्या गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्येचा हा मतदारसंघ असल्याने महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकांसाठी सोलापुरातील कामगारे नेते आडम मास्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांच्या ड्रीम प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदी सोलापुरात आले होते, त्या आडम मास्तरांनी काँग्रेसचा प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सोलापूरमध्ये पीएम आवास योजनेतील १५,००० घरांचे वाटप भव्य कार्यक्रमातून करण्यात आले होते. सोलापूर मधल्या कामगारांसाठी ही आवास योजना वरदायिनी ठरली असून कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांचेही मोठे प्रयत्न यासाठी राहिले आहेत. त्यामुळेच, नरसय्या आडम मास्तरांनी मोदींसोबत या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेज शेअर केला. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये याच रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करताना मोदी म्हणाले होते, या घरांचे भूमिपूजन आम्ही केले. घरांच्या चाव्या देण्यासाठी आम्हीच येणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. ते आज चाव्या द्यायला सोलापुरात आले. पीएम आवास योजनेअंतर्गत बनलेली ही घरे पाहून आम्ही खरोखरच धन्य झालो. सोलापूरच्या कामगार नगरीच्या वैभवात या घरांमुळे भर पडली, अशा शब्दात आडम मास्तर यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. मात्र, आता आडम मास्तर हे मोदींच्या भाजपा उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यास तयार आहेत.

आडम मास्तर यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे एक प्रस्ताव ठेलला आहे. त्यानुसार, सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने आम्हाला सोडावी. तर लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करु, अशी भूमिका नरसय्या आमड यांनी घेतली. प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरीही भाजपा हा आमचा मुख्य विरोधक आहे. त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ, असं नरसय्या आडम यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच, आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही इंडिया आघाडीत आहोत. त्यामुळे, तन-मन-धनाने आपण महाविकास आघाडीचा प्रचार करू, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे, नरसय्या आडम मास्तरांची अट महाविकास आघाडीला मान्य होईल का, आणि आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करतील का हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. 

दरम्यन, राम सातपुते यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी पत्र लिहून आमदार राम सातपुते यांना टोला लगावला. 'आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे. 

Web Title: ... while Adam Master will campaign for praniti Shinde of Congress; For whom PM Modi came to Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.