"भाजपाचं बियाणं अस्सल नाही; आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 05:24 PM2024-03-19T17:24:24+5:302024-03-19T19:08:02+5:30

भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे

"The seed of BJP is not genuine; Another attempt to steal Thackeray today. uddhav Thackeray on bjp-mns alliance of raj Thackeray and amit shah meeting | "भाजपाचं बियाणं अस्सल नाही; आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न"

"भाजपाचं बियाणं अस्सल नाही; आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न"

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच भेट घेतली. या भेटीनंतर महायुतीत मनसेची सोबत पक्की मानली जात आहे. राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासमवेतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत, पण महायुतीतील प्रवेशाबाबत अद्याप कुठेही जाहीर कबुली देण्यात आली नाही. मात्र, महायुतीत मनसेला २ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरेंच्या बदलेल्या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील नेते, त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच, राज ठाकरेंचे बंधु आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शाह-ठाकरेंच्या भेटीवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. 

भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे. निवडणूक आयोगानेच त्यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. तुमच्या बापाच्या नावाने मतं मागा, माझा बाप कशाला चोरता, असे म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करुन तुम्ही मत मागा, असा सल्लाही ठाकरेंकडून भाजपाला देण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा नांदेड येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. 

''भाजपाचा सगळा खोटारडेपणा आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, आपत्ती निवारण योजना मिळाली नाही. मोदींनी म्हटलं होतं, मी उत्पादन खर्च दुप्पट करेन, तोही झाला नाही. लागवडीचा खर्च वाढला आहे, खतांचा खर्च वाढला आहे. बियाणं तरी अस्सल मिळतंय का?,'' असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर बोचरी टीका केली.  

''अस्सल बियाणं भाजपातच नाही, तर ते शेतकऱ्यांना काय देणार. यांचं बियाणं सगळं बोगस आहे, हे सगळे बाहेरुन घेतात माणसं. आजही कोणीतरी घेतलंय त्यांनी. कारण, त्यांना माहितीय, महाराष्ट्रात मत मिळवायची असेल तर मोदी नावावर मत मिळत नाहीत. तर, आजही ते ठाकरे नावावरच मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा..'' असे म्हणत उद्धव ठाकरेंना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशावरुन बोचरी टीकाही केली. 

उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले - लोंढे

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: "The seed of BJP is not genuine; Another attempt to steal Thackeray today. uddhav Thackeray on bjp-mns alliance of raj Thackeray and amit shah meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.