मुंबई महापालिका श्रीमंत; रुग्णसेवेची मात्र हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:26 AM2019-02-04T05:26:07+5:302019-02-04T05:26:30+5:30

मुंबई शहरातीलच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाºया गरीब रुग्णांना महापालिकेची प्रमुख रुग्णालये जगण्याची नवी उमेद देतात.

Mumbai Municipal rich; but caretaker of patient care | मुंबई महापालिका श्रीमंत; रुग्णसेवेची मात्र हेळसांड

मुंबई महापालिका श्रीमंत; रुग्णसेवेची मात्र हेळसांड

googlenewsNext

- शेफाली परब-पंडित

मुंबई  - शहरातीलच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाºया गरीब रुग्णांना महापालिकेची प्रमुख रुग्णालये जगण्याची नवी उमेद देतात. खिसा फाटका असला, तरी गरजूंना महागडे उपचार येथे सहज उपलब्ध होतात. मात्र, देशातील श्रीमंत महापालिकेच्या अर्थसंकल्पातील जेमतेम दहा टक्के निधी आरोग्य यंत्रणेसाठी राखून ठेवण्यात येत आहे. त्यात डॉक्टर व इतर कर्मचाºयांची कमतरता, सफाईचा अभाव, निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये पाच रुग्णांना आलेल्या अंधत्वाच्या घटनेने पालिका रुग्णालयातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

तीन महिन्यांत ६५ टक्के निधीचे टार्गेट

मुंबईकरांना पुरविण्यात येणाºया मूलभूत सुविधांपैकी आरोग्य व्यवस्था एक आहे. सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात आरोग्य खात्यासाठी ३,६३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, डिसेंबर, २०१८ पर्यंत यापैकी केवळ ३४.६५ टक्के निधी वापरण्यात आला आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये याहून अधिक म्हणजे ४१ टक्के तरतूद वापरण्यात आली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी असल्याने, आणखी काही निधी आरोग्य यंत्रणेत अद्ययावत सेवा आणण्यासाठी वापरण्यात येईल. यामुळे वापरण्यात आलेल्या निधीचा आकडा अधिक असेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

आरोग्यासाठी अधिक तरतूद
उपनगरीय रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा आणि तत्काळ रोग निदानाची व्यवस्था नसल्यामुळे ६० टक्के गरीब रुग्णांना शहर भागातील मोठ्या रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. या रुग्णांचे हाल होतात, तसेच केईएम, सायन आणि नायर या प्रमुख रुग्णालयांवर ताण वाढतो. त्यामुळे महापालिकेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आरोग्यासाठी राखीव निधी वाढविण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयाचे रूपांतर बहुउद्देशीय रुग्णालयांमध्ये करून ते सक्षम करण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त आय. कुंदन यांनी सांगितले.

अर्थसंकल्प वाढला, पण आरोग्याचा टक्का कमीच
गेल्या पाच दशकांमध्ये अर्थसंकल्पात दोन हजार पटीने वाढ झाली आहे. १९६० मध्ये आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प १५.८४ कोटी होता. सन २००० मध्ये ३१७५.१४ कोटींच्या अर्थसंकल्पात ४६७.८१ कोटी म्हणजे १४.७३ टक्के आरोग्यासाठी राखून ठेवण्यात आले. १४ वर्षांनंतर महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ हजार १७२ कोटींवर पोहोचला असताना, आरोग्यासाठी केवळ २,९०७ कोटी म्हणजे ९.३ टक्केच तरतूद करण्यात आली होती.

उपनगरीय रुग्णालय सक्षम होणार
केईएम, नायर, सायन या तीन प्रमुख रुग्णालयांतील रुग्णांमध्ये गरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयांवर भार पडत असल्याने डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार घडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांच्या दर्जाेन्नतीचा निर्णय घेतला आहे. उपनगरीय रुग्णालयही सक्षम झाल्यास महापालिकेचा ताण कमी होईल, असा पालिकेचा विचार आहे. दर्जेदार आरोग्य व्यवस्था उपनगरीय रुग्णालयातही उपलब्ध करून गरीब रुग्णांनाही आगामी अर्थसंकल्पातून दिलासा देण्यात येणार आहे.

कर्मचा-यांचा तुटवडा वाढवतोय ताण
रुग्णालयात दर्जेदार यंत्रणा आल्यानंतरही ही सेवा पुरविण्यासाठी आवश्यक कामगार नाहीत. याचा परिणाम रुग्णसेवेवर पडत आहे. जोगेश्वरी येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये दोन वेळा घडलेल्या घटना रुग्णांच्या जिवावर बेतल्या आहेत. रुग्णाला उंदीर चावणे आणि पाच रुग्णांना आलेले अंधत्व या घटनांनी रुग्णालयातील निष्काळजी कारभार उघड केला आहे. मात्र, ट्रॉमा केअर सेंटरवरील रुग्णांवर मानद डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व अन्य कर्मचा-यांवर कारवाई केल्याबद्दल आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव यांनी नाराजी व्यक्त केली.

 

जोगेश्वरी ट्रॉमा केअरचे वास्तव : रूग्णांना अंधत्त्व आल्यानंतर नेत्रशल्यचिकित्सा विभाग बंद 

मुंबई : सहा वर्षांपूर्वी पश्चिम उपनगरातील रुग्णसेवा सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून जोगेश्वरी येथे सुरू झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मनुष्यबळाची तुटवडा असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होताना दिसत आहे. सेंटरमध्ये अत्याधुनिक उपकरणे असूनही मनुष्यबळाची कमतरता असल्याने याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. नुकत्याच घडलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या प्रकरणानंतर येथील नेत्रशल्यचिकित्सा विभाग सध्या बंद करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
२१ सप्टेंबर, २०१३ साली या सेंटरचे उद्घाटन झाले़ येथे ३०४ खाटांची क्षमता आहे. १२५ रुपयांचा निधी खर्च करून सुपरस्पेशालिटी सेंटर म्हणून असलेले हे पहिलेच रुग्णालय आहे. सध्या या रुग्णालयात केवळ २८२ एवढी कर्मचारी संख्या आहे. यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांचाही समावेश आहे. यात ९५ डॉक्टर असून, अन्य वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय व कर्मचाºयांचा समावेश आहे. या सेंटरमधील तीन वैद्यकीय अधिकारी व प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.
या सेंटरमध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे केसपेपर काढण्यापासून ते थेट बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी ताटकळत राहावे लागते. रुग्णांना जवळपास दीड तास उपचारांसाठी थांबावे लागते. अजूनही या सेंटरमध्ये डायलिलिसची सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना डायलिसिससाठी दूरच्या रुग्णालयात जावे लागते. सेंटरच्या बाह्यरुग्ण विभागात दिवसाला ८००-९०० रुग्ण येतात, त्यामुळे रुग्णसेवेचे मोठे आव्हान या सेंटरसमोर आहे. सेंटरमधील औषधांच्या साठ्यातही तफावत जाणवते. त्यात मागणी जास्त असून, पुरवठा होत नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. 
आधीही चावला होता उंदीर 
ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल एका रुग्णाला एप्रिल, २०१८ मध्ये उंदीर चावल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर, ४ जानेवारी, २०१८ रोजी सेेंटरमध्ये सात रुग्णांवर ४ जानेवारी रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनी म्हणजे ६ जानेवारी रोजी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, त्यांच्या डोळ्यांत जंतुसंसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली. या वेळी सात जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली असताना पाच जण दृष्टिहीन झाले. या प्रकरणानंतर वैद्यकीय अधीक्षक प्रभारी डॉ़ हरबन्स सिंग बावा, मेट्रन, सहायक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली़

पक्षाघातावर होणार सुलभ उपचार,
मशिनची चाचणी अंतिम टप्प्यात
एसआयसीयूचे १० खाटांची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. त्याप्रमाणे, एनआयसीयू आणि डायलिसिसची सेवा लवकरच सेंटरमध्ये सुरू होणार आहे. डायलिसिस सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, पक्षाघातावर कमी वेळात उपचार करणारे मशिन सेंटरमध्ये दाखल झाले असून, त्याची चाचणी अंतिम टप्पात आहे, याची सेवाही रुग्णांना मिळणार आहे. पालिका प्रशासनाने मनुष्यबळाची पूर्तता केल्यास रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे, त्याची प्रक्रियाही सुरू आहे.
- डॉ. राजेंद्र बच्छाव, वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी)
 

सायन रूग्णालयाची दुरवस्था : रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल; स्वच्छता नावालाही नाही! 

मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयावर पूर्व उपनगरातील नागरिकांसह राज्यासह देशभरातून येत असलेल्या रुग्णांचा भार आहे. त्या तुलनेत येथील मनुष्यबळ रुग्णांना पुरेशी सेवा देण्यात कमी पडत आहे. कारण येथे दाखल रुग्णांचे हाल तर होतच असून, रुग्णांसोबत येत असलेल्या नातेवाइकांनादेखील सेवा देण्यात प्रशासन कमी पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे, नाक, कान, डोळे आणि घसा हे विभाग वगळले, तर उर्वरित विभागात रुग्णांसह नातेवाइकांची परवडच सुरू आहे. विशेषत: येथील दर्शनी भाग वगळले, तर स्वच्छता येथे नावादेखील आढळत नसल्याचे चित्र आहे.
मुंबईची हद्द जिथे संपते, तिथे म्हणजे सायन येथे महापालिकेचे हे रुग्णालय आहे. पूर्व उपनगरासह देशभरातून रुग्ण दाखल होत असतात. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य आहे. फूटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत असतानाच, या रुग्णालयाच्या फूटपाथवरच फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. फेरीवाल्यांच्या जागेतही अस्वच्छता आहे़ तरीही रुग्णासोबत येथे येणारे नातेवाईक फेरीवाल्यांकडे आपले पोट भरत आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याचे निदर्शनास येते. कामादरम्यान पडलेला कचरा नातेवाइकांसह रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. यातून सातत्याने वातावरणात धूळ मिसळत आहे. नातेवाइकांना बैठकीसाठी निर्माण करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेची रया गेली आहे. बैठक व्यवस्थेच्या परिसरात कमालीची अस्वच्छता आहे. परिणामी, येथे बसण्याऐवजी रुग्णालयाच्या कट्ट्यावर नातेवाइकांना बसावे लागत आहे.
रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसºया मजल्यावरील अस्वच्छतेचा प्रत्यय येतो. तळमजल्यावरील वॉर्डमध्ये रुग्णांसोबत नातेवाइकांचा कमालीचा भरणा असून, नातेवाइकांनी रुग्णाच्या खाटेलगतच म्हणजे खाली आपले बस्तान मांडले आहे. मुळात येथे उपस्थित नातेवाइकांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था अथवा नातेवाइकांची गर्दी कमी असणे अपेक्षित असताना चित्र उलटे आहे. दुसºया मजल्यावरही गॅलरीच्या मोकळ्या जागेत नातेवाइकांची गर्दी असून, रुग्ण विभागात खाटेलगतच्या परिसरात नातेवाइकांचा भरणा अधिक आहे. तिसºया मजल्यावरही हेच चित्र असून, तिन्ही मजल्यावर रुग्णांसाठी ज्या सेवा देण्यात येतात, त्या सेवा घेताना येथे स्वतंत्र आणि स्वच्छ बैठक व्यवस्था अपेक्षित आहे.
समस्यांबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांना प्रत्यक्षत भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्या उपलब्ध नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावर उपअधिष्ठातानांही प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच उपलब्ध नसल्याचे संबंधितांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
बॅनर आणि दिशादर्शक
रुग्णालयाच्या दर्शनी भिंतीवर विविध सेवा देणाºया विभागांचे दिशादर्शक आणि भरमसाठ बॅनर लावण्यात आले आहेत. निम्मे दिशादर्शक रुग्णांसह नातेवाइकांना गोंधळात टाकत असून, निम्म्यांची दुर्दशा झाली आहे.
हेल्प डेस्क
मुळात रुग्णालयाचा हेल्प डेस्क तळमजल्यावर अपेक्षित असताना, हा हेल्प डेस्क तिसºया मजल्यावरील कोपºयात असल्याने हेल्प डेस्क शोधण्यात नातेवाइकांचा निम्मा वेळ खर्ची पडत आहे.
पोस्टर्स नावालाच
रुग्णालयाच्या प्रत्येक भिंतीवर धूम्रपान करू नका, तंबाखू खाऊन थुंकू नये, असे संदेश देण्यात आले आहेत. मात्र, जेथे जेथे हे संदेश देण्यात आले आहेत; तेथे तेथे पान, गुटखा, मावा असे तत्सम पदार्थ खाऊन अस्वच्छता पसरविण्यात आली आहे. 
काही भाग स्वच्छ
नाक, कान, घसा येथील रुग्ण विभागात स्वच्छता आहे. येथील वातावरण कोंदट नसून, रुग्णांसह नातेवाइकांना आवश्यक सेवा पुरविली जात आहे. येथील विभाग व्यवस्थित ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
तक्रार कोणाकडे करायची?
रुग्णालयात रुग्णांसाठी जे साहित्य दाखल केले जाते, त्यापैकी काही साहित्य रुग्णांपर्यंत नीट पोहोचत नाही, अशी तक्रार येथे नातेवाइकांकडून केली जाते. याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची? याची माहितीही नातेवाइकांना नाही. 
शौचालय अस्वच्छ
रुग्णालयातील शौचालय स्वच्छ अपेक्षित असतानाच, तळमजल्यासह उर्वरित ठिकाणांवरील शौचालय अस्वच्छ असून, येथे स्वच्छता नावादेखील नाही.
नूतनीकरण आणि धूळ
रुग्णालयात ठिकठिकाणी नूतनीकरण सुरू आहे. हे काम सुरू असताना लगतचा परिसर स्वच्छ राहील; याची काळजी प्रशासनाने घेतलेली नाही. परिणामी, धुळीचे साम्राज्य येथे पसरले असून, कामासाठीचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.
गोंधळात भर
रुग्णालयाच्या सेवा नेमक्या कोणत्या आहेत? कोणता विभाग कोठे आहे? याचा तक्ता दर्शनी भागावर असणे अपेक्षित आहे किंवा मदत केंद्र दर्शनी भागात अपेक्षित आहे. मात्र, केवळ दिशादर्शक आणि पोस्टर्सवरची माहिती सोडली, तर कोणती मदत नक्की कोठे मिळले? याची नेमकी माहिती रुग्णांसह नातेवाइकांनाही व्यवस्थित मिळत नाही.
 

केईएम रूग्णालय : नावनोंदणी बाहेर असल्याने रूग्णांच्या चकरा 

मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वात जुन्या असलेल्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेला अनुभव अगदी वेगळा आहे. रुग्णाला चांगले उपचार हवे असतील, तर त्यांनी नक्की केईएम रुग्णालयात यावे; मात्र त्यांच्यासह नातेवाईकांनीही तितकाच संयम राखणेही गरजेचे असल्याचे या वेळी पाहायला मिळाले.
केईएम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक प्रत्येकाचा रस्ता रोखतात. फक्त रुग्ण आणि त्यासोबत एक किंवा दोन नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश मिळतो. सुरुवातीला कोणत्याही रुग्णास १८ क्रमांक असलेल्या डेस्कवर उपचारासाठी पाठवले जाते. या ठिकाणी रुग्णाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी तीन ते चार डॉक्टर दिसतात. दरम्यान, एकाच वेळी पाच ते सहा रुग्ण आल्यावर डॉक्टर स्ट्रेचरवर असलेल्या रुग्णाला बाजूला थांबवून त्या ठिकाणी जाऊन त्याची प्राथमिक तपासणी करतात. त्यानंतर रुग्णाच्या व्याधीनुसार त्यास संबंधित विभागामध्ये उपचारासाठी पाठवले जाते.
‘लोकमत’ प्रतिनिधीने स्वत:ला चक्कर येत असल्याचे सांगत रुग्णालयात प्रवेश मिळवला. मात्र १८ क्रमांकांच्या डेस्कवर प्राथमिक तपासणी झाल्यानंतर रुग्णाची नावनोंदणी करण्यासाठी पुन्हा रुग्णालय इमारतीबाहेर पाठवण्यात आले.
रुग्णाची नावनोंदणी खिडकी इमारतीबाहेर असल्याने रुग्णाला चकरा माराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव या वेळी समोर आले. त्यानंतर १० रुपये भरून नावनोंदणी झाल्यानंतर पुन्हा २० ए क्रमांकाच्या वॉर्डमध्ये धाडण्यात आले.
२० ए या वॉर्डबाहेरही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला होता. तो रक्षक सर्व रुग्णांना वॉर्डबाहेर रोखून ठेवत होता. महत्त्वाची बाब म्हणजे वॉर्डमध्ये जाण्याआधी प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या एका टेबलवर एक डॉक्टर तपासणीसाठी ठेवण्यात आले होते. संबंधित डॉक्टरने तपासणी केल्यानंतरच रुग्णांना वॉर्डमध्ये प्रवेश दिला जात होता. लोकमत प्रतिनिधी वॉर्डबाहेर पोहोचला, त्या वेळी त्या ठिकाणी पहिल्यापासूनच चार ते पाच रुग्ण व नातेवाईक डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होते.
तब्बल ३० मिनिटांहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्यानंतर एक डॉक्टर धावपळ करत त्या डेस्कवर पोहोचला. एका रुग्णास तपासून पुन्हा संबंधित डॉक्टर वॉर्डमध्ये गेले. पुन्हा १५ मिनिटांनंतर तोच डॉक्टर डेस्कवर येऊन त्याने पुढील रुग्णास तपासले. अशा प्रकारे प्राथमिक तपासणीच्या वॉर्डमधील डॉक्टरांनी तपासणीसाठी रुग्णास साधारणत: एक तास खर्ची घालावा लागत असल्याचे समोर आले. 
रुग्ण म्हणतात : ‘पहिले स्लो, मग फास्ट’
या ठिकाणी उपस्थित रुग्णांशी संवाद साधला असता, रुग्णालयात दाखल करून घेईपर्यंत किंवा सुरुवातीला उपचार होण्यासाठी बराच वेळ लागतो. याउलट एकदा डॉक्टरांनी तपासणीसाठी वॉर्डमधील खाटेवर
झोपवल्यानंतर तातडीने उपचार होतात. त्यामुळे सुरुवातीपासून तातडीने उपचार करण्याची गरज रुग्ण व नातेवाइकांनी व्यक्त केली. 
डॉक्टर म्हणतात : रुग्णसंख्या पाहा!
येथील एका वरीष्ठ डॉक्टरसोबत चर्चा केली असता, उपचारासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत या ठिकाणी कमी कर्मचारी व डॉक्टर आहेत. एकच डॉक्टर एकाच वेळी तीन ते चार रुग्णांवर उपचार करत असतो. कमीत कमी वेळेत अधिकाधिक रुग्णांना तपासावे लागते. परिणामी, ज्या रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर आहे, त्याला प्राधान्य देत उपचार केले जातात. 
रुग्णालय परिसरात काय दिसले? 
अत्यवस्थ रुग्णांच्या व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांच्या मदतीला येथील सुरक्षारक्षकही धावून जातात.
रुग्णालय परिसरात पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे. काही भागात प्रचंड धूळ असून आवाजही होतो.
उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागांचा आणि बगिचांचा वापर मुक्कामासाठी केला जात आहे.
रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने मांजरआहेत. त्यामुळे रुग्णालयात स्वच्छता आहे, इतरत्र फिरणाºया मांजरींमुळे रुग्णांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात.
 

कूपर रुग्णालय ; स्वच्छता व सुरक्षा उत्तम, उपचारही तत्काळ 

मुंबई : सरकारी आणि पालिका रुग्णालये म्हटले की लोक नाक मुरडतात, पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षा पाहता हे रुग्णालय उत्तम उदाहरण आहे. विलेपार्ले येथील ५३ हजार चौरस मीटर भूखंडावर उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या ६ माळ्यांच्या इमारतीसाठी प्रवेश द्वाराजवळच सुरक्षा चौकी आहे. अग्निसुरक्षेसाठी प्रत्येक माळ्यावर सुरक्षा यंत्रणा आहे. नोंदणी विभाग, जन आरोग्य योजनेसाठी आणि त्याच्या चौकशीसाठीचा कक्ष आहे. नवीन आणि जुन्या ओपीडीसाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा यांची व्यवस्था प्रवेश केल्यानंतर लगेच आहे.
रुग्णालयात क्ष-किरण, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, भौतिकोपचार, दंत चिकित्सा, त्वचा रोग, शक्ती क्लिनीक, लसीकरण, रुग्णवाहिनी, शववाहिनी, शवागार आदी विभागांचा समावेश आहे. पूर्वी या रुग्णालयात आठ शस्त्रक्रियागार होती. आता त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी सात खाटांचा ट्रॉमा आणि अपघात विभाग, डायलिसीस केंद्र, सशुल्क रुग्णशय्या विभाग, त्याचबरोबर वैद्यकीय, शल्यक्रिया, नवजात शिशू, बालरुग्ण आणि हृदयरोग या अतिदक्षता विभागांचाही रुग्णालयात समावेश आहे. एकूण ६०० हून अधिक खाटांचा समावेश असलेल्या या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या १३०० हून अधिक आहे.
६ मळ्यांच्या या इमारतीमध्ये रुग्ण पहिल्या वेळेस गेल्यावर मात्र संबंधित विभाग शोधत राहतो. विभागांच्या दारावर नावे आणि क्रमांक अधिक असावेत, अशी रुग्णांची मागणी आहे. कुपरमधील अनेक विभाग आणि खोल्या अजूनही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत़ त्यांना आजही टाळे पाहायला मिळते. बाह्य ओपीडी, मेडिसिन विभागाच्या बाहेर रुग्णांच्या रांगा असतात. केसपेपरसाठी रांगा असल्या तरी रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळण्यासाठी कर्मचारी आणि डॉक्टर्सची संख्या पुरेशी असल्याचे चित्र रुग्णालयात दिसते. रुग्णालयाच्या महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर्सही येथे रुग्णांच्या सेवेसाठी रुजू आहेत. रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणजे हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या बाबतीत पुरेशी जागरूकता नसल्याचेच दिसून आले. 
इंटर्न डॉक्टरही रूग्णसेवेत सहभागी 
च्रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळण्यासाठी कर्मचारी आणि डॉक्टर्सची संख्या पुरेशी असल्याचे चित्र रुग्णालयात दिसते. रुग्णालयाच्या महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर्सही येथे रुग्णांच्या सेवेसाठी रुजू आहेत. त्यामुळे रूग्णांची परवड होत नाही़

Web Title: Mumbai Municipal rich; but caretaker of patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.