चॅट जीपीटीच्या धर्तीवर भारत जीपीटी; आयआयटी-टेकफेस्टमध्ये आकाश अंबानींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:51 AM2023-12-28T05:51:38+5:302023-12-28T05:52:29+5:30

भारत जीपीटीला केंद्र सरकारचे पाठबळ लाभले आहे.

india gpt on the lines of chat gpt information about akash ambani at iit techfest | चॅट जीपीटीच्या धर्तीवर भारत जीपीटी; आयआयटी-टेकफेस्टमध्ये आकाश अंबानींची माहिती

चॅट जीपीटीच्या धर्तीवर भारत जीपीटी; आयआयटी-टेकफेस्टमध्ये आकाश अंबानींची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): चॅट जीपीटीच्या धर्तीवर जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या तंत्रावर आधारित भारतकेंद्री असे बहुभाषक भारत जीपीटी विकसित करण्यात येत असून, त्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या अग्रगण्य संस्थांसोबत काम करत असल्याची माहिती रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी बुधवारी आयआयटी-टेकफेस्टमध्ये दिली. 

भारत जीपीटीला केंद्र सरकारचे पाठबळ लाभले आहे. ते रिलायन्स समूहाच्या जिओ इन्फोकॉम, सीता महालक्ष्मी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (नासकॉम) यांच्यामार्फत चालविले जाते. भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे एआय तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणेल. 

येत्या काळात मीडिया, वाणिज्य आणि तंत्रज्ञानामध्ये एआय आधारित सेवा सुरू करण्यावर आमचा भर असेल. आम्ही त्याबद्दल सर्वसमावेशकपणे विचार करत आहोत, अशा शब्दांत त्यांनी त्या तंत्रज्ञानाच्या भविष्याचा आढावा घेतला.

एआयचा अर्थ माझ्या मते ऑल इन्क्लुलेड असाही होतो. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात त्याचा कार्यक्षमपणे समावेश कसा करता येईल, असा आमचा प्रयत्न आहे. कारण, मानवी जीवनाच्या सर्व अंगांना एआयने स्पर्श केला आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर व्हायला हवा. पुढील दशक हे एआयचेच असेल. त्या दृष्टीने आम्ही आतापासूनच तयारी करतो आहोत, अशी माहिती अंबानी यांनी दिली.

सामूहिक उपक्रम

आयआयटी-मुंबईच्या संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख गणेश रामकृष्णन हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. नवतंत्रज्ञान, भारतीय भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचा मिलाफ असलेले हे अनोखे साधन असेल, अशी माहिती रामकृष्णन यांनी दिली. सर्व आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, अशा भारताला अनुकूल पद्धतीने ते विकसित करण्यात येणार आहे.
 
या उपक्रमात मद्रास, हैदराबाद, मंडी, कानपूर आयआयटी, हैदराबादची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आणि इंदूरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) यांचा समावेश आहे. चॅट जीपीटीच्या धर्तीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने बहुभाषिक स्वदेशी मॉडेल तयार केले जाणार असल्याचे आकाश अंबानी म्हणाले. हे तंत्रज्ञान टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांबरोबर आयआयटी, भाषिणी, डीएआरपीजी यांच्यातील तज्ज्ञही योगदान देतील.
 

Web Title: india gpt on the lines of chat gpt information about akash ambani at iit techfest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.