आता तरी फेरीवाले हटणार का? मुंबईत ४,७७३ फेरीवाल्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:05 AM2024-04-02T10:05:32+5:302024-04-02T10:07:39+5:30

ठोस उपाययोजना आवश्यक. 

in mumbai muncipality has taken action against the unauthorized hawkers outside the railway station | आता तरी फेरीवाले हटणार का? मुंबईत ४,७७३ फेरीवाल्यांवर कारवाई

आता तरी फेरीवाले हटणार का? मुंबईत ४,७७३ फेरीवाल्यांवर कारवाई

मुंबई :रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये खार, दादर, चेंबूर, मालाड, घाटकोपर सारख्या वर्दळीच्या स्थानकांचा समावेश आहे. ५ मार्चपासून हाती घेण्यात  कारवाईमध्ये ५३ रेल्वे स्थानकाबाहेरील ४,७७३ फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली. असे असले तरी पुन्हा काही दिवसांनी हे फेरीवाले आपले बस्तान आणि व्यवसाय थाटून बसतात. त्यामुळे आता तरी फेरीवाले हटणार का? असा सवाल स्थानिक दुकानदार आणि प्रवासी करीत आहेत. पालिकेकडून रोज किमान चार रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यावर कारवाई करून तो परिसर फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. 

रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे मात्र नियम धाब्यावर बसवून अनधिकृत फेरीवाले आपली दुकाने थाटून बसतात. मुंबईतील दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, सीएसटी, आदी रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी वेढला गेला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना कसरत करून चालावे लागत आहे.

पालिका मुख्यालयासमोरच बस्तान-

सीएसएमटी रेल्वे स्थानकातील भुयारात सुरक्षारक्षक ठेवूनही येथे अनधिकृत फेरीवाले वाट अडवून बसत असल्याचे दिसून येत आहे. भुयाराच्या बाहेरच्या मोकळ्या जागाही फेरीवाल्यांनी गजबजून जातात. येथे पालिकेचे मुख्यालय बाजूलाच आहे मात्र पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

मोकळ्या जागांवर अतिक्रमणे-

१)  रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून फेरीवाले रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पुलावर सर्रास व्यवसाय करीत आहेत. 

२) संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून आधीच विविध विभागात अस्वच्छता पसरविणाऱ्यावर कारवाई होत आहे. 

३)  या अनधिकृत फेरीवाल्यांची कारवाई ही परिसर मोकळा करण्यास मदत झाली आहे. 

४) मोकळ्या जागा अडविल्या जात असल्याने नागरिकांना कसरत करून चालावे लागत आहे. 

कारवाई करूनही पुन्हा ‘जैसे थे’-

१) दादर असो किंवा मालाड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई पालिकेकडून तीव्र केली.

२) कारवाईच्या कालावधीत येथील रस्ते काहीसे मोकळे झाल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते मात्र पुन्हा काही तसंही आणि दिवसाने हे फेरीवाले आपले बस्तान आणि व्यवसाय थाटून बसत असल्याच्या तक्रारी स्थानिक दुकानदार आणि प्रवासी करतात. 

३) कारवाईनंतर पालिकेने तेथे पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान मांडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा मागणी स्थानिक करीत आहेत. 

Web Title: in mumbai muncipality has taken action against the unauthorized hawkers outside the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.