मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. बेकायदा फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची मागणी असल्याचे ठाकरे यांनी आयुक्तांना सांगितले. फेरीवाल्यांमध्ये मराठी माणूस असल्याचे बोलले जाते. मग रस्त्यांवरून चालणारा माणूस मराठी नसतो काय, असा सवालही त्यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांसमोर उपस्थित केला.
एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी संतप्त मोर्चा काढला होता. या दुर्घटनेसाठी अरुंद पुलाइतकेच पादचारी पुलांवर ठाण मांडणारे फेरीवालेही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पदपथ, पूल, रस्ते फेरीवालामुक्त करण्यासाठी त्यांनी महापालिकेला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीप्रमाणे पालिका फेरीवाल्यांवर काय कारवाई करीत आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतली.
फेरीवाल्यांवर कारवाई करताना अनेकवेळा रेल्वे आणि महापालिकेत हद्दीचा वाद निर्माण होतो. यासाठी आयुक्तांनी रेल्वे महाव्यवस्थापकांबरोबर बैठक घेऊन हद्दीचा वाद सोडवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यावर दोन्ही प्राधिकरणांची हद्द ठरवून महापालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर कारवाई करू, अशी
हमी आयुक्तांनी दिल्याचे राज
ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तांकडे मांडलेली संकल्पना रेल्वे महाव्यवस्थापकांकडेही मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियमित कारवाई करा
महापालिकेच्या कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा त्याच जागी येऊन बसतात. त्यांच्यावर सतत कारवाई केल्यास मुंबई फेरीवालामुक्त करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसहभाग हवा
फेरीवाल्यांचा रोजगार जावा, यासाठी ही मागणी नाही. मात्र करदात्याला रस्त्यांवरून चालता यावे, यासाठी हा लढा आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसतात म्हणून लोक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करतात.या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग आणि जागरूकता अपेक्षित असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार
फेरीवाल्यांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्याची मागणी केली असून ती आयुक्तांनी मान्य केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.