"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:46 PM2023-11-06T15:46:38+5:302023-11-06T15:49:32+5:30

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे

Chhagan Bhujbal in chhatrapati sambhajinagar's visit, Manoj Jarange says on maratha reservation | "बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी २ महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यानुसार, जरांगे यांनीही उपोषण मागे घेत सरकारला अल्टीमेट दिला आहे. दुसरीकडे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली असून ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होत आहेत. त्यातच, मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते. भुजबळांनी छत्रपती संभाजीनगर येथे असून मनोज जरांगे यांची भेट टाळली. तसेच, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले. भुजबळांच्या या विधानावर जरांगे पाटील यांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, पत्रकारांनी जरांगे पाटील यांना, तुम्ही भुजबळांवर बोलत का नाहीत, असा प्रश्न केला होता. 

भुजबळांना भेटण्याचा काही संबंध नाही. पण, मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी बोलणार नाही. आरक्षणावर कोणी बोलत असेल तर मी सोडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या छत्रपती संभाजीनगर भेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. 

मागच्या दरवाजाने एंट्री मिळवण्याचा प्रकार

आपल्यावर अन्याय होत असेल, दुःख झालं असेल तर कोणीही औषध देणार नाही. ज्यांची नोंद अगोदर असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही. मात्र संपूर्ण राज्यात असेच वाटप करू नये. समोरच्या दरवाज्यातून इंट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. यासाठी माळी,कोळी, धनगर,वंजारी, तेली, तांबोळी साळी, यांनी वेगळवेगळा आवाज उठवू नये, सर्वांनी एकत्र आवाज उठवावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

१७ नोव्हेंबरला ओबीसींचा मोर्चा

मंत्री छगन भुजबळ यांनी दोदडगाव येथील मंडलस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर वडीगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, १७ तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसीच्या महामोर्चाचे आयोजन केले असून सर्वांनी एकत्र यावे. निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चाला या. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण, मोर्चे काढून एका आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही भुजबळ यांनी म्हटले. 
 

Web Title: Chhagan Bhujbal in chhatrapati sambhajinagar's visit, Manoj Jarange says on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.