"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:47 PM2024-02-17T12:47:03+5:302024-02-17T12:48:01+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे.

"by settling all judgments of ncp party and symbole"; Sharad Pawar's serious allegations against the Assembly Speaker rahul narvekar | "सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

मुंबई - राज्यात २० फेब्रुवारीचे विशेष आणि २६ पासूनच्या बजेट अधिवेशनात अजित पवार गटाकडून व्हिपचा वापर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी, अशी विनंती शुक्रवारी शरद पवार यांच्या वतीने सरन्यायाधीशांच्या पीठापुढे केली. त्यावर, सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्तींचे पीठ स्थापन करुन सुनावणीची तारीख निश्चित करण्यात येईल, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी विधानसभा अध्यक्षांवर थेट गंभीर आरोप केला आहे. तसेच, पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट झाल्याचंही पवार यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नसल्याचं शरद पवार यांनी बारामतीमध्ये संवाद साधताना म्हटलं होतं. त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर भाष्य केलं. यावेळी, पक्ष आणि चिन्ह या निर्णयाबाबत सेटलमेंट झाल्याचा गंभीर आरोपही पवार यांनी केला.  

विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

असा निर्णय होईल याची खात्री मला होती, कारण विधानसभा अध्यक्षांना, त्या पदाला जी प्रतिष्ठा आहे, ती त्यांनी ठेवली नाही. तसेच, ते प्रतिष्ठा ठेवतील, असेही वाटत नाही, असाच निर्णय त्यांनी घेतला. याअगोदरही शिवसेनेच्या नेत्यांच्याबाबतीत तोच निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर, आता आमच्या लोकांबाबतही त्यांनी तोच निर्णय घेतला. पण, पक्ष आणि चिन्ह याबाबतची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली, सभापतींनी घेतली, ती आमच्या मते आम्हाला न्याय न देणारी आहे. याशिवाय पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याचा हा निर्णय असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं. आता, याचा पर्याय म्हणजे वरच्या कोर्टात जाणे हेच होय. त्यामुळे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील केलं असून सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी आमची विनंती आहे. कारण, निवडणूक काही दिवसांवर आल्या आहेत, असेही पवार म्हणाले. 

सेटल करुन निर्णय
 
आत्तापर्यंत अनेक असे निर्णय झाले. पण, पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांना देणं कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली, पक्षाची उभारणी कोणी केली. तरीही, पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं हा निर्णय येणं हे आमच्यावर अन्याय आहे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. सध्या काही लोकांनी जाहीर सभेतून या दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसांत मिळतील, असे सांगितलं होतं. त्यामुळे, आम्हाला तेव्हाच हे लक्षात आलं होतं, हे सगळे निर्णय सेटल करुन घेतले जाणार आहेत, जे आपल्यासाठी अन्यायकारक असणार आहेत. 

मी ५ वेळा वेगवेगळ्या चिन्हावर लढलो

देशात याआधी असं घडलं नाही की, ज्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या. कोणाला वाटत असेल चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल. मात्र असं कधी होत नसतं, असं शरद पवारांनी सांगितलं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या. 
 

Web Title: "by settling all judgments of ncp party and symbole"; Sharad Pawar's serious allegations against the Assembly Speaker rahul narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.