मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक; आचारसंहितेपूर्वी धमाकेदार निर्णयांची घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:58 PM2024-03-15T22:58:38+5:302024-03-15T22:59:57+5:30

राज्य मंत्रिमंडळाची आठवडाभरातील तिसरी बैठक उद्या पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Big News State Cabinet meets again tomorrow likely to Make big decisions before lok sabha election code of conduct | मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक; आचारसंहितेपूर्वी धमाकेदार निर्णयांची घोषणा?

मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक; आचारसंहितेपूर्वी धमाकेदार निर्णयांची घोषणा?

Cabinet Meeting ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला असून मंत्रिमंडळाची एकाच आठवड्यातील तिसरी बैठक उद्या पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करणार आहे. त्यापूर्वी मतदारांना भुरळ घालण्यासाठी सरकारकडून काही मोठ्या निर्णयांची घोषणा होऊ शकते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अहमदनगर जिल्हा आणि वेल्हे तालुक्याच्या नामांतरासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर लोकांच्या भावनांना हात घालणारे निर्णय घेऊन जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न या निर्णयांच्या माध्यमातून महायुती सरकारकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाची आठवडाभरातील तिसरी बैठक उद्या पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

दरम्यान, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय मोठे निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक कोणते निर्णय घेण्यात आले?

- मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

- पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये

- अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता

- केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता

- श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार

- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

- भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

- राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

- महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार

- मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार

- मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार

- शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

- मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

- आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

- कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

- पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

- म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

- आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

- मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

- मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते

- भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

- महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

- जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

- दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना
 

Web Title: Big News State Cabinet meets again tomorrow likely to Make big decisions before lok sabha election code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.