Andheri Bridge Collapse: 'हे' फोटो पाहा; लगेच कळेल अंधेरीचा पूल पडण्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:01 PM2018-07-03T16:01:19+5:302018-07-03T16:45:17+5:30

सोशल मीडियावर पुलाचे फोटो व्हायरल

andheri Gokhale bridge collapse Pictures prove structure was already weak | Andheri Bridge Collapse: 'हे' फोटो पाहा; लगेच कळेल अंधेरीचा पूल पडण्यामागचं कारण!

Andheri Bridge Collapse: 'हे' फोटो पाहा; लगेच कळेल अंधेरीचा पूल पडण्यामागचं कारण!

मुंबई: अंधेरी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवानं गर्दीची वेळ नसल्यानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आता यावरुन मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. या दोन्ही यंत्रणांनी एकमेकांकडे बोट दाखवत हात झटकले आहेत. सकाळी कोसळलेल्या गोखले पुलाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा पूल नेमका का कोसळला, हे या फोटोवरुन स्पष्ट दिसत आहे. 



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये गोखले पुलाची दुरवस्था दिसून येत आहे. टाईम्स नाऊनं हा फोटो प्रसिद्ध केला आहे. हा पूल मोकडळीस आलेल्या स्थितीत होता, हे या फोटोंवरुन स्पष्ट दिसत आहे. पुलाखालून टिपण्यात आलेल्या फोटोमध्ये लोखंडी सळया स्पष्ट दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लोखंडी सळया गंजलेल्या असतानाही प्रशासनानं पुलाची दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलावरुन दिवसभर ये-जा सुरू असतात. हजारो माणसं, शेकडो वाहनं या पुलावरुन दररोज प्रवास करतात. त्यामुळे हा पूल कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याचा धोका होता. मात्र तरीही रेल्वेनं या पुलाची दुरुस्ती केली नाही. 

गोखले पूल 1971 मध्ये पालिकेनं बांधला. यानंतर या पुलाच्या देखभालीचं काम पालिकेनं रेल्वे प्रशासनाकडे सोपवलं. याचा खर्च पालिकेकडून रेल्वेला दिला जात होता, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 2013 मध्ये या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र या पुलावरुन सतत वर्दळ सुरू असल्यानं दुरुस्ती होऊ शकली नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचा हीच चालढकल हजारो लोकांच्या जीवावर बेतू शकली असती. मात्र मुंबईकरांच्या सुदैवानं तसा अनुचित प्रकार घडला नाही. 
 

Web Title: andheri Gokhale bridge collapse Pictures prove structure was already weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.