lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'स्टार्ट नाऊ'... मुकेश अंबानींनीच भावी जावयाला दिला होता यशाचा मंत्र

'स्टार्ट नाऊ'... मुकेश अंबानींनीच भावी जावयाला दिला होता यशाचा मंत्र

काही दिवसांपूर्वी आनंद पिरामल यानं मुकेश अंबानींचे जाहीर आभार मानले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 11:09 AM2018-05-07T11:09:14+5:302018-05-07T11:09:14+5:30

काही दिवसांपूर्वी आनंद पिरामल यानं मुकेश अंबानींचे जाहीर आभार मानले होते.

mukesh ambani gave success mantra to anand piramal | 'स्टार्ट नाऊ'... मुकेश अंबानींनीच भावी जावयाला दिला होता यशाचा मंत्र

'स्टार्ट नाऊ'... मुकेश अंबानींनीच भावी जावयाला दिला होता यशाचा मंत्र

मुंबईः देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची लाडाची लेक ईशा लवकरच पिरामल उद्योगसमूहाचा वारसदार आनंद पिरामल याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. म्हणजेच, आनंद हा भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबाचा जावई होणार आहे. पण, आनंद आणि मुकेश अंबानी यांचं नातं गुरू-शिष्याचं आहे, सासरेबुवा हे जावईबापूंचे 'गाईड' आहेत, असं एका प्रसंगावरून लक्षात येतं. 

काही दिवसांपूर्वी आनंद पिरामल यानं मुकेश अंबानींचे जाहीर आभार मानले होते. त्यांच्यामुळेच आपण उद्योजक झाल्याचं तो म्हणाला होता. अंबानींनी आपल्याला काय सल्ला दिला होता, कसं समजावलं होतं आणि तोच यशाचा मंत्र कसा ठरला, हेही आनंदनं उलगडून सांगितलं होतं. 

मी कन्सल्टिंगमध्ये करिअर करावं की बँकिंगमध्ये?, असा प्रश्न आनंदनं अंबानींना विचारला होता. त्यावर अंबानींनी दिलेलं उत्तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरावं असंच आहे. ते म्हणाले होते, 'कन्सल्टंट होणं म्हणजे क्रिकेटचा सामना बघण्यासारखं किंवा समालोचन करण्यासारखं आहे, पण उद्योजक होणं हे मैदानावर प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यासारखं आहे. समालोचन करून तू क्रिकेट खेळायला शिकू शकत नाहीस. जर तुला खरंच काही करून दाखवायचं असेल, तर उद्योजक हो आणि त्यासाठी आजच कामाला लाग.' अंबानींचा हा सल्ला आनंदनं ऐकला आणि आज तो देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीचा - पिरामल रिअल्टीचा कार्यकारी संचालक आहे.

आनंद पिरामलनं पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली आहे. इंडियन मर्चंट चेंबरच्या यूथ विंगचा आनंद अध्यक्षही होता. तर, २६ वर्षांची ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया विषयात ग्रॅज्युएशन केलं आहे. 

आनंद-ईशा यांच्या लग्नामुळे अंबानी आणि पिरामल यांच्यातील चार दशकांच्या मैत्रीचं नात्यात रूपांतर होणार आहे. महाबळेश्वर येथील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून आनंद साजरा केला होता. ईशाचा लग्नसोहळा डिसेंबरमध्ये भारतातच होईल, असं जाहीर करण्यात आलंय.

मार्च महिन्यातच, ईशाचा जुळा भाऊ आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा झालाय. त्यांचं शुभमंगलही डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. 

Web Title: mukesh ambani gave success mantra to anand piramal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.