lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा  

Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा  

४ लाख कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीपासून विविध बाबींसाठी करावी लागणारी कोट्यवधींची तरतूद यामुळे खर्चाच्या मर्यादा पडलेल्या सरकारने थोर पुरुषांच्या नावाने योजना आणत अर्थसंकल्पाला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे.

By यदू जोशी | Published: March 10, 2018 03:30 AM2018-03-10T03:30:08+5:302018-03-10T03:30:08+5:30

४ लाख कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीपासून विविध बाबींसाठी करावी लागणारी कोट्यवधींची तरतूद यामुळे खर्चाच्या मर्यादा पडलेल्या सरकारने थोर पुरुषांच्या नावाने योजना आणत अर्थसंकल्पाला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtra Budget 2018: Social Pledge to Expenditures | Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा  

Maharashtra Budget 2018 : खर्चाच्या मर्यादेला सामाजिक मुलामा  

मुंबई : ४ लाख कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीपासून विविध बाबींसाठी करावी लागणारी कोट्यवधींची तरतूद यामुळे खर्चाच्या मर्यादा पडलेल्या सरकारने थोर पुरुषांच्या नावाने योजना आणत अर्थसंकल्पाला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकल्याणाच्या या योजनांसाठी अत्यल्प तरतूद करण्यात आली असली, तरी त्या निमित्ताने अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा देण्याचा प्रयत्न वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. विविध समाज आणि त्या-त्या भागातील नामवंतांबाबत असलेल्या स्थानिक भावनांना या निमित्ताने हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही स्मारकांचाही समावेश आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबाकाका यांच्या नावे संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला मंडळाची वर्धा येथे स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या मंडळाच्या माध्यमातून मातीकलेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य विकास, अधिक कलात्मक उत्पादने, विक्री व्यवस्था व निर्यातीची व्यवस्था करण्यात येणार आहे. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रेरणादायी कार्याच्या स्मरणार्थ स्मारक निर्माण करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, एवढाच उल्लेख आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.

थोर पुरुष, साहित्यिक, कलावंतांचा सन्मान

थोर पुरुषांचे साहित्य प्रकाशित करणे, त्यांची स्मारके उभारणे, यासाठी तरतूद करीत त्यांचा सन्मान करण्याचे पाऊल राज्य सरकारने आज अर्थसंकल्पात उचलले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराजा सयाजीराव गायकवाड या थोरांचे साहित्य सहज उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या नावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे व ग.दि.माडगुळकर यांची जन्मशताब्दी व राम गणेश गडकरी स्मृती शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक उभारण्यात येणार असून, सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते व नाट्यकलाकार मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मारक उभारण्यात येणार आहे, तसेच कविवर्य ग.दि.माडगुळकर यांचे शेटेफळे, ता.आटपाडी, जि.सांगली येथील स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

थोरांच्या साहित्यासाठी
स्वतंत्र वेबसाइट करणार
पाडगावकर, कांबळी
यांची स्मारके उभारणार
श्री चक्रधर स्वामींच्या
नावे नागपुरात अध्यासन

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सोईसुविधा पुरविण्यासाठी राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन औरंगाबाद येथील वसतिगृह व सभागृह यांच्या विस्तारीकरणासाठी व दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Web Title: Maharashtra Budget 2018: Social Pledge to Expenditures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.