lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिश्चिततेच्या वातावरणात अस्वलाची घट्ट पकड

अनिश्चिततेच्या वातावरणात अस्वलाची घट्ट पकड

मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये अस्वलाची मिठी आणखी घट्ट झालेली दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:29 AM2019-05-13T01:29:28+5:302019-05-13T01:29:59+5:30

मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये अस्वलाची मिठी आणखी घट्ट झालेली दिसून आली.

Bear clutches in uncertainty environment | अनिश्चिततेच्या वातावरणात अस्वलाची घट्ट पकड

अनिश्चिततेच्या वातावरणात अस्वलाची घट्ट पकड

- प्रसाद गो. जोशी

अमेरिका आणि चीन दरम्यानची व्यापार विषयक चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिका आणि चीनने परस्परांच्या वस्तुंवर वाढविलेले कर, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, भारतामधील लोकसभा निवडणुकांचे जवळ येत असलेले निकाल, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले संमिश्र निकाल आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेल्या विक्रीने शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये अस्वलाची मिठी आणखी घट्ट झालेली दिसून आली. सप्ताहाचा प्रारंभच निर्देशांक ३८,७१९.३३ अंशांपर्यंत खाली येऊन झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३८,८३५.५४ ते ३७,३७०.३९ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३७,४६२.९९ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १५००.२७ अंश ( ३.८ टक्के) घट झालेली दिसून आली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही सप्ताहात घसरणच दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ४३३.३५ अंशांनी (३.७ टक्के) खाली येऊन ११,२७८.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप हा क्षेत्रीय निर्देशांक ३९३.५९ अंशांनी (२.६७ टक्के) खाली येऊन १४,३८९.७६ अंशांवर बंद झाला.
स्मॉलकॅपमध्ये ३.०५ टक्कयांची म्हणजेच ४६८.६८ अंशांची घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १४,०७९.४७ अंशांवर बंद झाला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापारविषयक बोलणी अंतिमक्षणी फिसकटली. त्यानंतर दोन्ही देशांनी ताठर भूमिका घेतल्याने आंतरराष्टÑीय बाजार चिंताग्रस्त झाले. त्यातच भारतामधील आस्थापनांचे आलेले निकाल संमिश्र राहिल्याने बाजारावर विक्रीचा दबाब आला .देशातील अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधील जाहीर झालेली आकडेवारीही फारशी समाधानकारक नसल्याने बाजार घसरला. त्रिशंकू लोकसभा येण्याच्या शक्यतेने परकीय वित्तसंस्थांनी गुंतवणूक काढून घेणे सुरूच ठेवले आहे.

व्याजदरातील संभाव्य कपात वाढीला पोषक
- देशातील चलनवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला असल्याने भारतीय रिझर्व्ह बॅँक आगामी पतधोरणामध्ये व्याजदरामध्ये पाव टक्का कपात करण्याच्या अटकळी बाजारात वर्तविल्या जात आहेत. याशिवाय रिझर्व्ह बॅँकेकडून बॅँकांना भांडवल पुरवठा केला जात आहे. यामुळे आगामी काळात भारतामधील बॉण्डस्च्या व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
देशभरामधून चलनी नोटांची मागणी वाढत असून खुल्या बाजारात व्याजदरामध्ये ०.९ने कपात झाली आहे. मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या आगामी पतधोरणामध्ये व्याजदरामध्ये पाव टक्कयाने कपात होण्याची अपेक्षा बाजार बाळगून आहे. तसेच बॅँकांना खुल्या बाजारामधून भांडवल मिळणार असल्याने त्यांच्या हातातील पैसाही मुबलक असेल. परिणामी पुढील महिन्यानंतर बॉण्डस्च्या व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता बाजारात वर्तविली जात आहे.

Web Title: Bear clutches in uncertainty environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.