Join us  

Indian Idol Marathi च्या मंचावर पहिल्यांदाच येणार उत्तरा केळकर आणि आरती अंकलेकर टिकेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 3:12 PM

गायिका उत्तरा केळकर आणि शास्त्रीय संगीतातल्या सूरसम्राज्ञी आरती अंकलीकर-टिकेकर 'इंडियन आयडल मराठी'' (Indian Idol Marathi) च्या मंचावर येणार आहेत. 

 सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होत असून ती भाषा मराठी असल्याने रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे.  येणाऱ्या आठवड्यात शास्त्रीय आणि सुगम संगीताची मैफील रसिकांना ऐकायला मिळणार आहे. ‘चिकमोत्यांची माळ’, ‘खोप्यामध्ये खोपा’, ‘बंधू येईल न्यायला', 'गौरी गणपतीच्या सणाला’, यांसारखी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या गायिका उत्तरा केळकर आणि शास्त्रीय संगीतातल्या सूरसम्राज्ञी आरती अंकलीकर-टिकेकर 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार आहेत. 

  उत्तरा केळकर यांंनी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमांतूनही त्या आपली कला सादर करतात. अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता गाऊन  त्यांना जनमानसात अधिक लोकप्रिय करण्याचं काम उत्तरा केळकर यांनी केलं आहे. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती अशा जवळपास दहा ते बारा भाषांमध्ये चारशेहून अधिक चित्रपटगीते गायली आहेत. आवाजातला गोडवा आणि तोलून-मापून सहज उमटणारे हृदयस्पर्शी सूर यांमुळे केळकर त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सरदारी बेगम, अंतर्नाद, दे धक्का, एक हजाराची नोट, इत्यादी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांची मुलगी स्वानंदी टिकेकर 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे आरतीताईंचं येणं हे स्वानंदीसाठी एक सरप्राईज होतं. सुगम आणि शास्त्रीय संगीत यांची ही जोडी स्पर्धकांना संगीताच्या या दोन मुख्य प्रकारांचं मार्गदर्शन देणार आहेत. 

टॅग्स :इंडियन आयडॉलसोनी मराठी