Join us  

पोळी टाळून नव्हे, पोळी खाऊन वजन करा कमी; 4 प्रकारच्या पोळ्या वेटलॉससाठी कामाच्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 7:18 PM

वजन कमी करण्यासाठी पोळी ही उपयुक्त नाही म्हणून पोळी खाण्याची टाळण्यापेक्षा आपण रोजच्या जेवणात जी पोळी खातो ती अधिक फायबरयुक्त आणि कमी कॅलरी असलेली कशी असेल याचा विचार करावा. यासाठी आहार तज्ज्ञांनी पौष्टिक आणि चविष्ट पोळ्यांचे पर्याय सांगितले आहेत.

ठळक मुद्दे केवळ गव्हाची पोळी खाणं ही त्यातील ग्लुटेन घटकामुळे वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते.आरोग्यदायी चार प्रकारच्या पोळ्या वजन कमी करण्यास मदत करतात.बदाम, ज्वारी, बाजरी, नागली या चार पिठाच्या पोळ्या वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारातील मुख्य घटक वजा करुन कुठल्यातरी नवीन पदार्थाचा समावेश करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हा ट्रेण्ड चुकीचा असल्याचं आहार तज्ज्ञ म्हणतात. आपल्या नियमित आहारात जे पदार्थ असतात ते टाळून वजन कमी करण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा आपण जे पदार्थ खातो तेच अधिक आरोग्यदायी केले तर त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी नक्की होतो. पोळी-भाजी हा आपल्याकडील आहारातले मुख्य घटक. पण मग वजन कमी करण्यासाठी पोळी ही उपयुक्त नाही म्हणून पोळी खाण्याचं टाळलं तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यापेक्षा आपण रोजच्या जेवणात जी पोळी खातो ती अधिक फायबरयुक्त आणि कमी कॅलरी असलेली कशी असेल याचा विचार करावा. यासाठी आहार तज्ज्ञांनी पौष्टिक आणि चविष्ट पोळ्यांचे पर्याय सांगितले आहे. केवळ गव्हाची पोळी खाणं ही त्यातील ग्लुटेन घटकामुळे वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते. पण पोळी आपल्या आहारातून काढून न टाकता हीच पोळी वेगळ्या प्रकारे करुन वजन कमी करता येतं .

Image: Google

1. बदाम पीठ+ कणिक

आहारतज्ज्ञ म्हणतात की बदामाचं पीठ वापरुन पोळी करता येते हे खूपच कमी जणांना माहिती असतं. प्रथिनं, आरोग्यदायी फॅटस, इ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेलं बदामाचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. या पिठात मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम यांचं प्रमाण चांगलं असतं. तसेच या पिठात फायटिक अँसिड भरपूर प्रमाणात असतं. याचाच अर्थ हा की बदामाच्या पिठाची पोळी खाल्ली तर शरीराला पोषक मूल्यं भेटतील तसेच वजनही कमी होईल. बदामाचं पीठ दुकानांमधे उपलब्ध असतं.बदाम पिठाची पोळी करताना पाव कप बदामाचं पिठ आणि पाऊण कप गव्हाचं पीठ घ्यावं. दोन्ही एकत्र करुन नेहेमीसारखं पिठ मळून घ्यावं. थोडं मुरु द्यावं. या पिठाची पोळी नियमित खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. पण बदामाच्या पिठाचे पोळी खाताना पोळ्यांचं आहारातलं प्रमाण थोडं कमी ठेवावं. म्हणजे दिवसभरात आपण चार पोळ्या खाणार असू तर बदामाच्या पिठाच्या दोन पोळ्याही पुरतात.

Image: Google

2. बाजरी पीठ+ कणिक

नुसत्या बाजरीची भाकरी आपण नेहेमीच खातो. विशेषत: थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते. पण बाजरीच्या पिठाची पोळी खाल्ली आहे का? बाजरीच्या पिठाची पोळी ही ग्लूटेन फ्री असते. फायबरचं प्रमाण भरपूर असतं. प्रथिनं, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक घटक बाजरीच्या पिठाच्या पोळीतून मिळतात. शिवाय बाजरीच्या पिठाची पोळी खाल्ल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. त्यामुळे सतत भूक लागत नाही.बाजरीच्या पिठाची पोळी करताना अर्धा कप बाजरीचं पीठ आणि तेवढीच कणिक घ्यावी. दोन्ही पिठं एकत्र करुन पीठ भिजवावं आणि पोळ्या कराव्यात. बाजरीच्या पिठाची पोळी खूप चविष्ट लागते. ही पोळी रोजच्या जेवणात असल्यास कमी काळात वजन कमी होतं असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

3. नागली पीठ + कणिक

नागलीचं पीठ हे ग्लूटेन फ्र आहे. यात फायबर आणि अमिनो अँसिड भरपूर असतात. नागलीच्या पिठातले हे गुणधर्म भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. नागली आहारात असल्यामुळे वजन कमी होतं, शरीराला ऊर्जा मिळते तसेच पचनही सुधारतं. वजन कमी होण्यासोबतच नागलीमुळे हदयही निरोगी राहातं. नागली मुळातच रुचकर असल्यानं नागलीच्या पिठाची पोळी खूप चविष्ट लागते.नागलीच्या पिठाची पोळी करण्यासाठी पाव कप नागलीचं पीठ आणि पाऊण कप कणिक एकत्र करुन पीठ मळून घ्यावं आणि या पिठाच्या पोळ्या कराव्यात.

Image: Google

4. ज्वारी पीठ+ कणिक

ज्वारीच्या पिठामुळे वजन कमी होतं. ज्वारीचं पीठ ग्लूटेन फ्री तर असतंच सोबतच त्यात पचनाला मदत करणारे फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, ब आणि क जीवनसत्त्वं असतात. त्यामुळे या पिठाची पोळी खाल्ल्यानं वजन तर कमी होतंच सोबतच ज्वारीतल्या गुणधर्मामुळे पचन क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित रहाते.ज्वारीच्या पिठाची पोळी करताना अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप कणिक घ्यावी. ही दोन्ही पिठं एकत्र करुन पीठ मळून घ्यावं आणि पोळ्या कराव्यात.