Join us  

कोरियन ब्युटीसारखं परफेक्ट स्लिम फिट व्हायचंय? त्यांचे 5 नियम आणा अमलात, व्हा के ब्यूटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 4:40 PM

कोरियामधील तरुण मुलीच नाही तर प्रौढ महिला देखील छान शिडशिडीत बांध्याच्या असतात. या बायका इतक्या स्लिम ट्रिम कशा दिसतात याचं आपल्याकडे खूप कुतुहल आहे. त्यांच्या दिसण्याचं रहस्य त्यांच्या आहार विहारात आहे. काय आहे हे रहस्य?

ठळक मुद्देकोरियन महिलांच्या आहारात एखादा पदार्थ हा आंबवलेला असतोच. आपण किती खातो याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं.दिवसभरात जास्तीत जास्त शारीरिक हालचाली करण्यावर त्यांचा भर असतो.

सध्या जग जवळ आल्यामुळे जगभरातले फॅशन आणि ब्यूटी ट्रेण्डस बर्‍यापैकी आपल्या परिचयाचे झालेले आहेत. काही गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात फॉलो करु शकतो तर काही गोष्टींचं आपल्याला कायम अप्रूप आणि कुतुहल वाटत राहातं. कोरियन संगीत आणि कोरियन ब्यूटी ट्रेण्ड यामुळे कोरियन महिलांचे फोटो आपल्याला सतत पाहायला मिळतात.कोरियामधील तरुण मुलीच नाही तर प्रौढ महिला देखील छान शिडशिडीत बांध्याच्या असतात. या बायका इतक्या स्लिम ट्रिम कशा दिसतात याचं आपल्याकडे खूप कुतुहल आहे. अर्थात या महिला वजन कमी करण्यासाठी वेटलॉस फॉर्म्युला फूडच खातात किंवा वेटलॉस फॉर्म्युला ड्रिंक्सच पितात असं नाही. उलट ते यातलं काहीही न खाता पिता एक सामान्य जीवन जगताना आहार आणि विहाराचे नियम तेवढे पाळतात. केवळ कोरियन महिला यांच्या स्लिम ट्रिम फिगरबद्दल कुतुहल बाळगण्यापेक्षा त्यांचे आहार विहाराचे नियम समजून घेतले तर त्याचा उपयोग आपल्यालाही करणं सहज शक्य आहे.

Image: Google

कोरियन महिला स्लिम ट्रिम कशा?

1. कोरियन महिलांच्या आहारात एखादा पदार्थ हा आंबवलेला असतोच. आंबवलेले पदार्थ पचन क्रिया सुधारण्यास महत्त्वाचे मानले जातात. या पदार्थांमुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहाते आणि वजन कमी करण्यासही आंबवलेले पदार्थ मदत करतात.

2. कोरियन महिला आहारात केवळ एकाच घटकावर भर देत नाही. तर आपल्या आहारात निरोगी आरोग्यास आवश्यक असलेले सर्व घटक असतील याची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या आहारात प्रथिनं, कर्बोदकं आणि फॅटस देखील असतात. पण हे सर्व घटक प्रमाणात असतात. शिवाय खाताना किती खावं याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. एकाच वेळेस खूप खाणं त्या टाळतात. आपल्या दिनक्रमात संतुलित आहारासोबतच व्यायाम, शारीरिक हालचाल याकडेही विशेष लक्ष देतात.

Image: Google

3. भाज्यांच्या बाबतीत आपण खूपच आपल्या आवडी निवडीला महत्त्व देतो. त्यामुळे पोषक भाज्याही केवळ त्या चवीला आपल्याला आवडत नाही म्हणून त्या आपल्या आहारात समाविष्ट करत नाही. पण कोरियन महिलांचं तसं नाही. ते इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा सर्व प्रकारच्या भाज्यांना खूप महत्त्व देतात. तसेच खातांनाही त्या भाज्याच जास्त खातात. भाज्यांमधील जीवनसत्त्वं आणि खनिजांचा फायदा निरोगी राहाण्यासोबतच वजन नियंत्रित राहाण्यासही होतो. भाज्यांमधे उष्मांक कमी असतात. तंतूमय घटक म्हणजेच फायबर जास्त असतं. त्याचा परिणाम खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. भाज्यांचं प्रमाण आहारात जास्त असल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहातं.

4. कोरियन महिला फिट राहाण्यासाठी फास्ट फूड, तसेच बाहेरचं खाणं टाळतात. घरी शिजवलेलं अन्न खाण्यावर भर देतात. त्यांच्यामते बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड हे आरोग्यास घातक असतात, ते प्रोसेस्ड फूड असल्याने वजन तर वाढतंच पण हे पदार्थ आजारांनाही आमंत्रण देतात. त्यामुळे बाहेरच्या पदार्थांपेक्षा कोरियन महिला घरच्याच अन्नाला प्राधान्य देतात.

Image: Google

5. कोरियन महिला पायी चालण्याला महत्त्व देतात. कामाच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी या महिला कार, बस, दुचाकी वाहन यापेक्षा पायीच जातात. रोजच्या जगण्यात जास्तीत जास्त शारीरिक हालचालींना महत्त्व देतात. कोरियन महिलांची ही आहार विहार शैलीचं त्यांच्या स्लिम ट्रिम असण्याचं खास सिक्रेट आहे. कोरियन महिलांचं हे सिक्रेट फॉलो करणं आपल्यासाठीही अवघड नाही हे खरंच!