Join us  

वजन कमी करायचं, मग नाश्त्याला खा नागलीची भाकरी आणि प्या नागली मिल्कशेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 5:31 PM

आपल्या पारंपरिक अन्न धान्यांमधे वजन कमी करण्यासोबतच योग्य पोषणाचे गुणधर्म असतात. नागली हे असंच एक गुणी धान्य आहे. सकाळी नाश्त्याला नागलीची भाकरी, नागलीचा शेक घेतल्यास ते वजन कमी करण्यास परिणामकारक ठरतं.

ठळक मुद्देनागलीमधे महत्त्वाची अमिनो अँसिडस असतात. हे घटक आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखतात. नागलीत मोठ्या प्रमाणावर फायबर असल्यामुळे दिवसभर पचन व्यवस्था सुरळीत काम करते. वजन कमी करण्यासोबतच शरीराला योग्य पोषण देण्यासाठी नागलीचा शेक पिण्याला महत्त्व आहे.

वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांना अवघड वाटतो. पण व्यायामाला जर पोषक आहाराची जोड दिली तर हा प्रवास केवळ सोपाच होतो असं नाही तर तो रुचकर आणि आरोग्यदायीही होतो. वजन कमी करण्यासाठी आहारात नागलीचा समावेश करणं ही खूप परिणामकारक बाब ठरते. सध्या वजन कमी करायचं म्हटलं की परदेशी अन्न पदार्थ खाल्ले जातात. पण आपल्या पारंपरिक अन्न धान्यांमधे वजन कमी करण्यासोबतच योग्य पोषणाचे गुणधर्म असतात. नागली हे असंच एक गुणी धान्य आहे. सकाळी नाश्त्याला नागलीची भाकरी, नागलीचा शेक घेतल्यास ते वजन कमी करण्यास परिणामकारक ठरतं.

 छायाचित्र- गुगल

आहाराला पौष्टिक करण्याचे क्षमता नागलीमधे आहे. नागली या धान्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे गहू आणि तांदूळ याला योग्य पर्याय नागली ठरतो. नागलीमधे आइसोल्यूसीन, ट्रिप्टोफेन, वेलिन, मेथियोनीन, थ्रेओनीन सारखी महत्त्वाची अमिनो अँसिडस आहेत. नागली शाकाहारी तसेच वेगन या दोन्हींसाठी उपयुक्त मानली जाते.

नाश्त्याला नागलीची भाकरी खाल्ली तर

1. नागलीमधे क, ई, बी कॉम्पलेक्स सारखी जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, अँण्टिऑक्सिडण्टस, प्रथिनं, फायबर आणि पुरेशा प्रमाणात उष्मांक ( कॅलरी) आणि गुड फॅटस असतात. त्यामुळे सकाळी नाश्त्याला नागलीची भाकरी खाणं हा पूर्ण आहार समजला जातो.रात्रीच्या गाढ झोपेनंतर सकाळी उठतो तेव्हा पाचन व्यवस्था उत्तम अवस्थेत असते. त्यामुळे नाश्त्याला जर नागलीची भाकरी, नागलीच्या रव्याचा उपमा, नागलीच्या पिठाची उकड, पेज असं काही खाल्लं तर पचन व्यवस्या सुदृढ होते. नागलीतले गुणधर्म शरीराचं पोषण करतात. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवतात. नागलीच्या सेवनामुळे हदय, मेंदू, फुप्फुसं, आतडे येथे रक्तप्रवाह सुरळीत होतो.2. नागलीमधे महत्त्वाची अमिनो अँसिडस असतात. हे घटक आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखतात. दात, हिरड्यांचे आजार बरे होतात. शिवाय शरीरातील जखमी स्नायुंची दुखापत बरी करण्यास नागलीतील गुणधर्म उपयोगी पडतात.3. गव्हामधील ग्लुटेनचा अनेकांना त्रास होतो. पचनाच्या समस्या निर्माण होतात. पण नागली हे ग्लुटेन फ्री धान्य आहे. त्यामुळे पोळीला उत्तम पर्याय नागली आहे. नागली ही सकाळच्या आहारात म्हणूनच नाश्त्याला खाणं आवश्यक आहे. कारण नागलीत मोठ्या प्रमाणावर फायबर असल्यामुळे दिवसभर पचन व्यवस्था सुरळीत काम करते. रात्री नागलीची भाकरी किंवा नागलीचे पदार्थ खाणं योग्य नाही. विशेषत: ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी रात्री नागलीची भाकरी किंवा इतर पदार्थ खाऊ नयेत.

 छायाचित्र- गुगल

4. नागलीमधे नैसर्गिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबूत करण्यासाठी, वृध्दांच्या हाडाची घनता जपण्यासाठी, ऑस्टियोपोरोसिस सारखा हाडांच्या गंभीर आजारची लक्षणं कमी करण्यासाठी नागली खाणं हा पौष्टिक आहार समजला जातो. नागलीच्या सेवनानं किडनीच आरोग्यही जपलं जातं.5. नागलीमधे उष्मांक, कर्बोदकं  मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय यात फाइटेटस , टॅनिन, पॉलीफेनॉल्स हे घटकही असतात. त्यामुळे नागलीच्या सेवनानं पचन क्रिया मंद होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल  त्यांच्या रक्तातील साखर कमी करण्याचं काम नागली करते. शिवाय नागलीत भरपूर प्रमाणात फायबर असल्याने नागली खाल्ल्यानं वजन लवकर घटतं. मधुमेह आणि स्थूलता नियंत्रित ठेवण्यासही नागलीचा उपयोग होतो. 6. लोहाची कमतरता आपल्याकडी महिला आणि मुलांमधे मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे थकवा जाणवतो, काम करवेनासं होतं. नागली म्हणजे लोहाचा खजिना आहे. नागलीमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. अँनेमियाग्रस्त रुग्णांसाठी नागली म्हणजे वरदान आहे. आहारात नागलीचा समावेश केल्यास अँनेमिया बरा होण्यास मदत होते.

नागलीचा शेक

 छायाचित्र- गुगल

वजन कमी करण्यासोबतच शरीराला योग्य पोषण देण्यासाठी नागलीचा शेक पिण्याला महत्त्व आहे. पोटाच्या आरोग्यासठी हा शेक खूपच फायदेशीर समजला जातो.हा शेक तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे नागलीचं पीठ, 1 कप दूध, 2 चमचे वेलची पावडर, सुका मेवा, 1 मोठा चमचा किसलेला बदाम आणि मध एवढी सामग्री घ्यावी.शेक करताना आधी एका कढईत दूध गरम करुन घ्यावं. दूध मध्यम आचेवर ठेवावं. दुधाला उकळी आली की त्यात नागलीचं पीठ घालून ते सतत ढवळायचं. त्यात एकही गुठळी राहायला नको. थोड्या वेळानं गॅस बंद करावा. एका ग्लासमधे हे मिश्रण काढून घ्यावं. शेकमधे मध घालावं. आणि सर्वात शेवटी आवश्यक वाटल्यास त्यात सुका मेवा घालवा.सकाळी नाश्त्याला नागलीचा शेक पिल्याने दिवसभर पोट भरल्यासारखं राहातं. नागलीचा शेक पिल्यानंतर सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. वजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया उत्तम असणं आवश्यक् आहे. जे खाऊ ते पटकन पचायला हवं. यासाठी नागली खूपच फायदेशीर ठरते. नागलीमधील फायबर पचनाला सहाय्य करतं.नागलीमधील पोषक घटक आणि फायबरमुळे पचन सुधारतं. हा शेक पिल्यानं आतड्यांमधील अन्नावर प्रक्रिया करण्याची गती वाढते. त्यामुळे अन्न पचायला मदत होते.