Join us  

चहा आणि नारळाच्या दुधाचा? पिऊन तर पाहा; चवीला उत्तम - वेटलॉससाठी परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 5:09 PM

वजन कमी करण्यासाठी परिणामकारक चहाच्या यादीत आणखी एक चहा समाविष्ट झाला आहे तो म्हणजे नारळाच्या दुधाचा चहा. वजन कमी करण्यासोबतच या चहाचे इतरही आहेत महत्त्वपूर्ण फायदे.

ठळक मुद्देआता एक शोध अभ्यास सांगतो की नारळाच्या दुधाचा चहा पिल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते.नारळाच्या दुधाचा चहा पिल्यास त्वचा चमकते. त्वचेचा पोत सुधारतो. वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी जसं फायदेशीर असतं तसंच नारळाच्या दुधाचा चहा देखील वजन कमी करण्यासाठी परिणामकारक असतो.

वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चहा परिणामकारक ठरतात. ग्रीन टी, ब्लॅक टी, तुळशीचा चहा, पुदिन्याचा चहा हे प्रकार वजन कमी होण्यासाठी , आरोग्य नीट राखण्यासाठी, त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी म्हणून प्यायले जातात. वजन कमी करण्यासाठी परिणामकारक चहाच्या यादीत आणखी एक चहा समाविष्ट झाला आहे तो म्हणजे नारळाच्या दुधाचा चहा. नारळ, नारळाचं पाणी, नारळाचं तेल हे आरोग्यदायी असतं हे आपल्याला माहिती आहे. सोलकढीमधे नारळाचं दूध आपण नेहेमीच वापरतो, पण नारळाच्या दुधाचा चहा असा आपण विचार देखील केलेला नव्हता. पण अमेरिका आणि युरोपमधील काही भागात हा नारळाच्या दुधाचा चहा प्यायला जातो. नारळाच्या दुधात संपृक्त फॅटस जे विरघळतात. तसेच यात मोठ्या प्रमाणात लॉरिक अँसिड, मॅग्नेशियम, लोह, क जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि फायबर असतं. ग्रीन टी, ब्लॅक टी यांचा वापर करुन नारळाच्या दुधाचा चहा करुन प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच त्वचा, ह्दय, रोगप्रतिकारशक्ती यासाठी तो फायदेशीर ठरतो.

छायाचित्र- गुगल

कसा करतात नारळाच्या दुधाचा चहा?

नारळाच्या दुधाचा चहा करणं अतिशय सोपं आहे. आपण नेहेमी वापरतो ती चहा पावडर वापरुन हा चहा करता येतो, दालचिनी, लवंगा, काळे मिरे हे मसाले एकत्र कुटुन ही पूड चहात टाकून मसाला चहा करता येतो. पण नारळाच्या दुधाचा चहा हा खास आरोग्याचा, वजनाचा विचार करुन बनवायचा झाल्यास ग्रीन टी चहा बॅग्ज वापराव्यात.हा चहा तयार करण्यासाठी 4 कप पाणी, 3 ग्रीन टी बॅग्ज, अर्धा कप नारळाचं दूध, 2 चमचे साय, 1 चमचा ब्राउन शुगर एवढंच जिन्नस लागतं.

नारळाच्या दुधाचा ग्रीन टी करताना आधी एका भांड्यात 4 कप पाणी उकळत ठेवावं. त्या पाण्यात तीन ग्रीन टी बॅग्ज टाकाव्यात. पाण्याला चांगली उकळी अली की गॅसची आच मंद करुन पाव कप नारळाचं दूध आणि दोन मोठे चमचे दुधाची साय घालावी. दुधाची साय ऐच्छिक आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर चहा चमच्यानं नीट हलवून घ्यावा. नंतर त्यातील टी बॅग्ज काढून टाकाव्यात. सर्वात शेवटी त्यात ब्राऊन शुगर घातली की नारळाच्या दुधाचा चहा तयार होतो.

छायाचित्र- गुगल

नारळाच्या दुधाचा चहा का प्यावा?

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर्स नारळाचं पाणी पिण्याचा सल्ला देत होते. पण आता एक शोध अभ्यास सांगतो की नारळाच्या दुधाचा चहा पिल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. नारळाच्या दुधातील क जीवनसत्त्व हे ग्रीन टी मधील रोगप्रतिबंधक प्रक्रियेला आणखी बळ देतं.

1. आयुर्वेदात नारळाच्या दुधाला पौष्टिक मानलं जातं. नारळाच्या दुधात हायपर लिपिडेमिकचं संतुलन करण्याचा गुणधर्म असतो. नारळात आरोग्यदायी फॅटस आणि अँण्टिऑक्सिडण्टस हे गुण असतात. हे सर्व गुण त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर मानले जातात. नारळाच्या दुधाचा चहा पिल्यास त्वचा चमकते. त्वचेचा पोत सुधारतो,

2. वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी जसं फायदेशीर असतं तसंच नारळाच्या दुधाचा चहा देखील वजन कमी करण्यासाठी परिणामकारक असतो. नारळात वजन वाढवणारे फॅटस नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. तसेच नारळात कॅलरीज कमी असून पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी नारळाच्या दुधाचा उपयोग होतो.

छायाचित्र- गुगल

3. नारळाच्या दुधातील एचडीएल कोलेस्ट्रेरॉल आणि लॉरिक अँसिड हे गुणधर्म उच्च रक्तदाब कमी करुन हदयाचं आरोग्य सांभाळण्यात मदत करतात. हदयरोगाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञही आता नारळाच्या दुधाचा चहा पिण्याचा सल्ला देतात.

4. अभ्यास सांगतो की नारळाच्या पाण्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. नारळाच्या पाण्यामुळे पचनासंबंधीचे विकार बरे होण्यास मदत होते तसेच नारळाच्या दुधाच्या चहाचा फायदा पचनासंबंधीच्या समस्या आणि पचनाशी निगडित इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या विकारात दिसून येतो.

5. कुठलीही गोष्ट प्रमाणात घेतली तर ती फायदेशीर ठरते. हीच बाब नारळाच्या दुधाच्या चहाशीही निगडित आहे. त्यामुळे हा चहा वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी औषधासारखा प्रमाणशीर मात्रेत प्यावा असं तज्ज्ञ म्हणतात.