Join us  

पोटावरची चरबी झटकेपट कमी होते का? स्पॉट रिडक्शनच्या जाहिरातीला भूलण्यापूर्वी एवढं वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 5:13 PM

पोटावरची चरबी ही मशीन आणि जेल यांचा उपयोग करुन कमी करता येते हे खरं नाही. यासाठी व्यायाम आणि योग्य आहार या दोन उपायांना पर्याय नाही. 

ठळक मुद्देकाही लोक असे जाड दिसत नाहीत पण त्यांचं पोट मात्र दिसतं आणि जर तुमचं वजन दोन ते तीन किलो जास्त असेल तर ते पोटावरचं असू शकतं.त्यामुळे आहारानं ते कमी होऊ शकतं. गहू बंद करून भाकरी आणि हातसडीचा भात याकडे वळल्यास पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते.आहारात एकंदर कर्बोदकं कमी करून प्रथिनं वाढवावी.

-अर्चना रायरीकर

आहाराने आणि व्यायामाने कुठल्याही एका ठिकाणची चरबी कमी होते असं नाही पण एकाच भागावरची करायची असेल तर त्या ठिकाणचा व्यायाम जास्त करावा लागतो हेही तितकंच खरं. मशीन, जेल हे ऐकायला कितीही छान वाटत असले तरी त्यानं  फार काही फरक पडत असेल असं मला तरी वाटत नाही.हे फरक तात्पुरतेच असतात आणि बहुधा त्याला आहाराची जोड दिली जाते.  त्यामुळे खरं तर परिणाम त्याचाच होत असतो पण लोकांना वाटत की मशीनमुळेच झालंय.मी एकदा मुद्दाम हे प्रकरण काय आहे म्हणून एका अत्यंत प्रसिद्ध ठिकाणी मशीन आणि मसाज या उपायानं पोटावरील फॅट्स खरच कमी होतात का हे पहायला गेले होते.

गेल्यावर आधी वजन उंची बॉडी फॅट्स हे सर्व चेक केलं.मग मस्त आरामशीर झोपून मसाज , गरम वाटणारं मशीन वैगेरे प्रकार केले. मला मस्त स्वतःचं कौतुक करून घेतल्यासारखं वाटत होतं. पैसे भरपूर मोजले होते त्यामुळे म्युझिक, सेंटेड कॅण्डलस असा थाट माट होता.झालं की लगेच पाणी प्यायचं नाही असं सांगितलं. झाल्यावर परत वजन केलं ते 500 ग्रॅम्स कमी आलं. मग मी आता परत बॉडी फॅट चेक करू असं म्हणाले. पण  त्याला मात्र नकार दिला गेला.मला कळून चुकलं की जे काही कमी झालं होतं ते शरीरातील पाणी कमी झालं होतं.  जे मी दोन ग्लास प्यायले की परत येणार होतं.शिवाय पोट  कमी झालंय असं तरी मला माझ्या जीन्स वरून जाणवलं नाही. मला तरी हा वैयक्तिक अनुभव आला ,अजून कोणाला काही आला असेल तर मला माहित नाही पण मला असं वाटतं की योग्य आहार आणि व्यायाम याला पर्याय नाही.आता आपण बघू की खरंच पोट कमी होत का ? ते कसं शक्य आहे? 

पोटावर दोन प्रकारची चरबी असते एक म्हणजे  सबक्युटानोअस फॅटस म्हणजे  आपल्या त्वचेला लागून असलेली चरबी. दुसरी म्हणजे  व्हिसेरल फॅटस म्हणजे पोटाच्या आतल्या भागातील पोकळीत असलेली चरबी,  आणि ती कमी होणं जास्त महत्वाचं असतं कारण त्यांचा संबंध मधुमेह ,हृदय विकार अशा आजारांशी असतो . व्हिसेरल फॅटस आपण  बॉडी फॅट मशीनवर बघू शकतो जे आमच्या क्लिनिकला असतं. त्यामुळे जेव्हा पोट कमी करायचं असतं तेव्हा व्हिसेरल आणि  सबक्युटानोअस फॅटस असे दोन्ही कमी करायचं असतात. 

कधी कधी हॉर्मोनल समस्येमुळे किंवा अपचन होऊन गॅस असल्यानं देखील पोट फुगल्यासारखं वाटतं. मग त्यासाठी काय काय करता येईल ते आता आपण पाहू

1.पहिले म्हणजे आपलं वजन आपल्या उंचीप्रमाणे आहे का ते पहा

साधारण आपली उंची ( सेंमी) वजा 105 असं आपले योग्य वजन काढता येतं ( पुरुषांना वजा 100)जसं की जर उंची 160सेंमी असेल तर 160 वजा 105 म्हणजे 55 किलो वजन हवंतर आधी आपलं वजन किती जास्त आहे ते पाहा.2. त्यानंतरचा मुद्दा  योग्य आहार.  काही लोक असे जाड दिसत नाहीत पण त्यांचं पोट मात्र दिसतं आणि जर तुमचं वजन दोन  ते तीन किलो जास्त असेल  तर ते पोटावरचं असू शकतं.त्यामुळे आहारानं ते कमी होऊ शकतं.

3.दुसरं म्हणजे व्यायाम. यामध्ये कार्डिओ, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि ॲब्सअसे तिन्ही यायला हवे कमीतकमी 30 मिनिटं रोज व्यायाम केला पाहिजे . तसेच दिवसभर कृतीशील राहणं  महत्वाचं आहे.4.आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक ताण कमी करायचा प्रयत्न करणं.ताण तणाव यामुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतं आणि त्यामुळे पोटावरची चरबी साठवून ठेवली जाते .  यासाठी ध्यान, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम करायला हवे5..आहारातील कर्बोदकं कमी करावी आणि त्यातही रिफाइन्ड कार्ब जसे की साखर, ब्रेड, गोड पदार्थ कमी करावे आणि ज्वारी, बाजरी यासारखे कॉम्प्लेक्स कार्ब वाढवावे. 6. चपाती किंवा पोळी यात गहू असतो तो अनेकांना नीट पचत नाही,  कारण त्यामध्ये ग्लुटेन असतं आणि म्हणून गहू बंद करून भाकरी आणि हातसडीचा भात याकडे वळल्यास पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते.यात भाकरीकडे वळलो आणि वजन आणि पोट कमी झालं असा खूप लोकांचा अनुभव आहे.7. आहारात एकंदर कर्बोदकं कमी करून प्रथिनं वाढवावी.   म्हणजे नाश्त्याला पोहे न खाता मोड आलेले मूग खाणं.  यामुळे चयापचय वाढतं . आहारात  जास्तीचे कर्बोदकं आणि कमी प्रथिनं म्हणजे शरीरात जास्तीची चरबी हे सूत्र लक्षात ठेवा.8.आहारात जास्त सोल्युबल फायबर म्हणजे विद्राव्य तंतुमय पदार्थ असावे. एक वैज्ञानिक प्रयोगाद्वारे असं सिद्ध झालं आहे की सोल्युबल फायबर आहारात असल्ं की पोटाची चरबी  कमी होतेहे नैसर्गिकरित्या पेरू, पपया, संत्री, मोसंबी यात असतात आणि यांचे  सप्लिमेण्टस  आपल्या आहार तज्ज्ञांना विचारून घ्यावे.9. आहारात प्रोबायोटिक्स  असले पाहिजे. प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या आतडयात असलेले चांगले जीव जंतू. त्यासाठी आंबवलेले पदार्थ,दही,ताक असे पदार्थ घ्यावेत आणि गरज पडली तर सल्ल्यानं सप्लिमेण्ट घ्यावे.10.पाणी भरपूर प्यावं म्हणजे खोटी भूक लागणार नाही.साधारण 2 ते 3 लिटर पाणी प्यावं. तसेच गरम पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी सतत पण योग्य सल्ल्यानंच घेत राहावं. 

इतर उपाय1.दोन्ही वेळेस जेवण झालं की 1 चमचा भाजलेले जिरे आणि 1 चमचा भाजलेले जवस घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे.2.आहारात नैसर्गिक फॅट बर्नर्स जसे की दालचिनी, आवळा पावडर, जवस, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी या सर्व गोष्टींचा वापर योग्य सल्ल्यानं करावा.

अजून थोडेसे1.प्रत्येक घास खूप वेळ चावून खावा.2.भूक लागल्याशिवाय खाऊ नये.3.दोन घास कमी खा. पोटाला तडस लागेल इतकं खाऊ नये.4.खाली बसून जेवावं.5.पाटावर मांडी घालून खाली जेवायला बसलं की पोटावर ताण आल्यानं जास्तीचं जेवण जाणार नाही.6.रात्री उशिरा जेवू नये. 7.जेवल्या जेवल्या झोपू नये.8. नौकासन करावं. पोटासाठी खावं पण पोटाची काळजी जरूर घ्यावी. 

( लेखिका आहार तज्ज्ञ आणि सत्त्व आहार सल्ला केंद्राच्या संचालक आहेत.)