Join us  

मूग, मठ, चवळी या ३ कडधान्यांची डाएट जादू , सांगताहेत प्रसिध्द आहारतज्ज्ञ ॠजूता दिवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 8:42 PM

उन्हाळ्याच्या काळात पौष्टिक काय हे शोधण्यासाठी खूप दूर जाऊ नका. आपल्या स्वयंपाकघरातील मठ, मूग आणि लाल चवळी ही तीन कडधान्यं आपली पौष्टिकतेची गरज भागवण्यास पुरेशी आहेत.

ठळक मुद्देसध्या कोविडचा प्रादुर्भाव बघता प्रतिकारशक्ती बळकट करणं आणि कोविड झाला असल्यास त्यातून बरं होतांना शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी मूग, मठ आणि चवळी ही कडधान्यं म्हणजे ‘सूपर फूड’आहेत.मूग, मठ आणि चवळीमधे जीवनसत्त्वं, लोह सारखी खनिजं, झिंक, सेलेनियम हे घटक असतात.जेवणात मूग, मठ आणि चवळी भिजवून, जास्त उकडून त्याची लसूण खोबऱ्याचं वाटण लावून आमटी करणं, उसळी करणं, आरोग्यदायी मिसळ करणं , मोड आणून चटकदार चाट करणं,किंवा नाश्त्याला त्याचे डोसे बनवणं या विविध स्वरुपात मूग , मठ आणि चवळी यांचा समावेश करु शकतो.

जे आपल्या समोर असतं, जे आपल्याला सहज उपलब्ध असतं त्याचं आपल्याला विशेष महत्त्व नसतं. ते सोडून जे उपलब्ध होण्यास अवघड आहे त्याचा शोध आपण नेहेमीच घेत असतो. पौष्टिक काय? या प्रश्नाचं उत्तर शोधताना अवघड पर्यायांच्या मागे पळून आपला वेळ आणि पैसा दोन्ही जातं आणि विशेष काही परिणाम दिसतो असंही नाही. पौष्टिक काय? या प्रश्नाचं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ॠजूता दिवेकर यांच्याकडे अगदी सोपं उत्तर आहे. समाज माध्यमांवर याबाबत मार्गदर्शन करताना त्या म्हणतात की, उन्हाळ्याच्या काळात पौष्टिक काय? हे शोधण्यासाठी खूप दूर जाऊ नका. आपल्या स्वयंपाकघरातील मठ, मूग आणि लाल चवळी ही तीन कडधान्यं आपली पौष्टिकतेची गरज भागवण्यास पुरेशी आहेत.

ॠजूता दिवेकर म्हणतात सध्या कोविडचा प्रादुर्भाव बघता प्रतिकारशक्ती बळकट करणं आणि कोविड झाला असल्यास त्यातून बरं होतांना शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी ही कडधान्यं म्हणजे ‘सूपर फूड ’आहेत. उन्हाळ्याच्या काळात आहारात मूग, मठ आणि लाल चवळी यापैकी कोणत्यातरी एका कडधान्याचा समावेश रोज असायला हवा. आमटी, डोसा, चाट, मिसळ अशा विविध स्वरुपात आहारात त्याचा समावेश करु शकतो असं ॠजूता दिवेकर सांगतात.

सध्या कोरोनामूळे संचार निर्बंध आहेत. बाजारपेठाही फार कमी काळ उघड्या असतात. तेव्हा आपल्याला हवी असलेली फळं, भाज्या मिळतातच असं नाही. पण मूग , मठ आणि चवळी यांचा समावेश रोजच्या आहारात केल्यास त्याचा फायदा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात, ताण कमी करण्यास, आजारपणात शरीराची झालेली झीज भरुन काढण्यात, पीसीओडी, थायरॉइड, केस गळती, निद्रानाश यासारख्या अनेक समस्यात मठ, मूग आणि लाल चवळीच्या समावेशाचा चांगला परिणाम होतो.मूग, मठ आणि चवळीमधे जीवनसत्त्वं, लोह सारखी खनिजं, झिंक, सेलेनियम हे घटक असतात. शिवाय पदार्थांमधील कॅल्शिअम शोषून घेणारे, भूक नियंत्रित करणारे लायसिनसारखे आवश्यक अमिनो अ‍ॅसिडस यात असतात.

ॠजूता दिवेकरांनी उन्हाळ्याच्या दिवसात मूग, मठ आणि चवळी खाण्याचा केवळ सल्लाच दिला असं नाही तर या तीन गोष्टींचा समावेश कोणत्या स्वरुपात करावा याचं मार्गदर्शनही केलं आहे. जेवणात मूग, मठ आणि चवळी भिजवून, जास्त उकडून त्याची लसूण खोबऱ्याचं वाटण लावून आमटी करणं, उसळी करणं, आरोग्यदायी मिसळ करणं , मोड आणून चटकदार चाट करणं,किंवा नाश्त्याला त्याचे डोसे बनवणं या विविध स्वरुपात मूग , मठ आणि चवळी यांचा समावेश करु शकतो. या विविध स्वरुपात आहारात त्यांचा समावेश केल्यानं ते खाण्याचा कंटाळाही येत नाही.