Join us  

मैदा वजनच वाढवत नाही तर पचनसंस्थाच बिघडवतो! मैदा आहारात का नको, त्याची कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 1:18 PM

आहारात मैद्याला कमीत कमी स्थान देणं किंवा आहारातून मैदा वजा करणं ही आवश्यक बाब आहे. पण मैदा सहजासहजी सुटत नसेल तर तो कसा तयार होतो आणि मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढतं किंवा आरोग्य बिघडतं ते कसं हे नीट समजून घ्यावं.

ठळक मुद्देपीठ आणि मैदा तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ फरक आहे. हा फरकच आरोग्यास आणि वजन नियंत्रणास धोका निर्माण करतो.गव्हाच्या पिठापासून मैदा तयार होतो तेव्हा त्यात थोडेही पोषक तत्त्वं आणि तंतुमय घटक शिल्ल राहात नाही.मैद्यात अधिक प्रमाणात स्टार्च असतात. हे स्टार्च पोटात गेल्यानं वजन वाढतं.

वजन कमी करायचं ध्येय असेल तर रोज सकाळी उठून नाश्त्याला मैद्याचा समावेश असलेले ब्रेड, पराठे, बिस्किटं खाऊन कसं चालेल? आहारात जर पराठे, भटुरे, कुल्चा, नान, मोमोज, मैद्याचे गोड पदार्थ या कुठल्याही स्वरुपात मैदा असेल तर तो आपल्या वजनावर विपरित परिणाम करतो. मैद्यामुळे केवळ वजनच वाढतं असं नाही तर इतर आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.

आहारात मैद्याला कमीत कमी स्थान देणं किंवा आहारातून मैदा वजा करणं हाच त्यावरचा उपाय आहे. पण अमूक एक पदार्थ मैद्याचाच चांगला होतो किंवा मैद्याशिवाय अमूक पदार्थ शक्यच नाही अशी मानसिकता असल्यास आहारातून मैदा सोडवत नाही. ही मानसिकता बदलून मैद्याला असलेले पर्याय वापरुन पदार्थ केले तर खाण्याचा आनंद आणि आरोग्य जपण्याचं समाधान मिळतं. मैदा सहजासहजी सुटत नसेल तर तो कसा तयार होतो आणि मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढतं किंवा आरोग्य बिघडतं ते कसं हे नीट समजून घ्यावं.

छायाचित्र: गुगल 

मैदा कसा तयार होतो?

मैद्याच्या बाबतीत वारंवार आहार तज्ज्ञ जागरुक करत असतात. आहार तज्ज्ञ रंजना सिंह म्हणतात की गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्हीही गव्हापासूनच तयर होतं. पण पीठ आणि मैदा तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ फरक आहे. हा फरकच आरोग्यास आणि वजन नियंत्रणास धोका निर्माण करतो. गव्हाच्या पिठात गव्हाचा कोंडा हा काढून टाकला जात नाही. या कोंड्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व असतं. हा कोंडा म्हणजे पचनास उपयुक्त तंतुमय घटक आहे. या घटकची आपल्या शरीराला आवश्यकता असते. मैदा तयार करताना मात्र हाच महत्त्वाचा घटक काढून टाकला जातो. त्यामुळेच मैद्यात थोडेही पोषक तत्त्वं किंवा तंतुमय घटक शिल्लक राहात नाही. मैदा हा गुळगुळीत आणि चिवट बनतो. मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने मैदा हा आतड्यांना चिटकून राहातो. त्यातूनच अपचनासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच मैदा आरोग्यास हानिकारक होतो.

छायाचित्र: गुगल 

मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानं काय होतं?

1. आहार तज्ज्ञ रंजना सिंह म्हणतात की मैद्यात अधिक प्रमाणात स्टार्च असतात. हे स्टार्च पोटात गेल्यानं वजन वाढतं. मैदा सतत खाण्यात असेल तर हळूहळू शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणूनच वजन कमी करताना मैदा आधी आहारातून बाद करावा.

2. आहारात मैदा खाण्याचं प्रमाण वारंवार आणि जास्त असेल तर रक्तातील साखर झपाट्यानं वाढते. त्यामुळे रक्तात ग्लुकोज वाढतं. यामुळे शरीरात रासायनिक रिअँक्शन्स निर्माण होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यात गुठळ्या आणि हदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो.

3 मैदा हा गव्हाच्या पिठापासून तयार करतात. पण मैदा तयार करण्याच्या प्रक्रियेत गव्हाच्या पिठात असलेली सर्व प्रथिनं नष्ट होतात. त्यामुळे मैदा अँसिडिक होतो. हे अँसिड हाडातलं कॅल्शियम शोषून घेतं आणि परिणामी हाडं देखील ठिसूळ होतात.

वजन कमी करणं हे जर आपण गांभिर्यानं ठरवलं असेल तर मैद्याकडेही गांभिर्यानं बघा आणि आरोग्यदायी पावलं उचला असं आवाहन आहार तज्ज्ञ रंजना सिंह करतात.