Join us  

कडूलिंबाची पानं खाण्याचे फायदे कोणते? वजन कमी होतं त्यानं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 5:23 PM

वजन कमी करण्याच्या उपायातही कडूलिंबांचा उपयोग प्रभावीपणे होतो असं अभ्यासकांच्या आणि संशोधकांच्या लक्षात आल आहे. आणि म्हणूनच  वजन कमी करण्यासाठी कडूलिंबाची पान्ं खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहार तज्ज्ञही देऊ लागले आहेत.

ठळक मुद्देजेवण करतानाही पोट भरल्याचं समाधान कडूलिंबाच्या पानांच्या नियमित सेवनानं लवक र होतं.उष्मांकांचं चरबीत रुपांतर होण्याचा धोका कडूलिंबाच्या सेवनानं टळतो.कडूलिंब नियमित खाल्ल्यानं शरीराची चरबी शोषणाची क्षमता कमी होते. त्याचा उपयोग वजन कमी होण्यास होतो.

 गुढी पाडवा. दारातल्या तोरणात आणि अंगणातल्या गुढीसाठी आज कडूलिंबाच्या पानांना मोठा मान. घरातील मोठी माणसं या दिवशी कडूलिंबाची पानं स्वत:ही खातात आणि लहानांनाही खाण्यास देतात. अनेक घरात गुढी पाडव्याला आधी कडूलिंबाची चटणी खाल्ल्याशिवाय श्रीखंडाला हात लावू देत नाही. पण कडूलिंबाचं हे महत्त्व फक्त गुढी पाडव्यापुरतीच राहातं. आणि दूसऱ्या दिवसापासून कडूलिंबाचं महत्त्वं विसरलंही जातं. गुढी पाडव्याला कडूलिंब आपल्या आहारात प्रतिकात्म्क स्वरुपात येतो आणि कडूलिंबाची पानं खाण्याच्या महत्त्वाकडे आपलं लक्ष वेधतो. पण पाडवा सरला की कडूलिंबाचं आहारातील महत्त्वंही आपण डोळ्याआड करतो.कडूलिंबाच्या झाडाची पानं, फूलं, बिया, झाडाची साल हा प्रत्येक घटक औषधी असतो. अनेक आजारांवर कडूलिंब हा रामबाण उपाय आहे. तोंडाची स्वच्छता, त्वचेची आणि केसांची काळजी यावरच्या उत्पादनात तर कडूलिंबाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कडूलिंबाची पानं रोज चाऊन खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फॅटस, कर्बोदकं, लोह, कॅल्शिअम, तंतूमय घटक मिळतात. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ कडूलिंबाची चव कितीही कडू असली तरी कडूलिंबातील औषधी घटकांचा शरीरासाठी उपयोग करुन घेण्यासाठी कडूलिंबांची पानं आनंदानं खाण्यास सांगतात. पण तरीही आपण ते ऐकतो का?वजन कमी करण्याच्या उपायातही कडूलिंबांचा उपयोग प्रभावीपणे होतो असं अभ्यासकांच्या आणि संशोधकांच्या लक्षात आल आहे. आणि म्हणूनच  वजन कमी करण्यासाठी कडूलिंबाची पान्ं खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहार तज्ज्ञही देऊ लागले आहेत.

 

कडूलिंब वजन कसं कमी करतं?

- कडूलिंबाची पानं रोज चावून खाल्ल्यास शरीरात तंतूमय घटक जातात. ज्याचा उपयोग पचनासाठी होतो. यामुळे पचनक्रिया हळूहळू होते. पोट भरलेलं वाटत असल्यानं सतत खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय जेवण करतानाही पोट भरल्याचं समाधान कडूलिंबाच्या पानांच्या नियमित सेवनानं लवकर होतं.

- वजन कमी करण्यासाठी पचन क्रिया सूदृढ असणं गरजेची असते. कडूलिंबाची पानं चावून खाल्ल्यानं तयार होणाऱ्या रसानं पचन क्रिया सुधारते. शरीरातील जास्त उष्मांक जे वापरले गेले नाही तर त्याची चरबी तयार होते ते जास्तीचे उष्मांकाचं ज्वलन कडूलिंबामूळे होतं. उष्मांकांचं चरबीत रुपांतर होण्याचा धोका टळतो.

- कडूलिंबाच्या नियमित सेवनानं शरीरातील घातक रसायनं बाहेर टाकली जातात. कडूलिंबातील हा गुणधर्म वजन कमी करण्यास उपयुक्त मानला जातो

- कडूलिंबाची पानं चावून खाल्ल्यानं शरीराची अन्नातील आवश्यक पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढते तसेच चरबी शोषणाची क्षमता कमी होते. त्याचा उपयोग वजन कमी होण्यास होतो.

- कडूलिंबाच्या नियमित सेवनानं पचन क्रिया सुधारते.पचन क्रिया सुधारण्याबरोबरच चरबीचं ज्वलन होण्याची क्रियाही जलद होते.