Join us  

गरमागरम वरणभात त्यावर साजूक तुपाची धार, हे सूपर फूड आहे. फिट व्हायचं तर चला बॅक टू बेसिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 8:03 PM

गावठी तूप हे आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच वजन आटोक्यात ठेवतं आणि सौंदर्यही वाढवतं. आपल्या देशी तुपाचं महत्त्वं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य झालं असून तुपातील आरोग्यास लाभदायी अनन्यसाधारण गुणधर्मामूळे तुपाचा उल्लेख ‘द्रवरुप सोनं’ असा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतुपामधे चरबी विरघळवणारे ड, के , इ आणि अ जीवनसत्त्वं असतात. तुपातील हे पोषक घटक आपल्या शरीराच्या क्रिया उत्तम होण्यास मदत करतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.देशी तूप पचन क्रिया सुधारुन शरीरास ऊर्जा देण्यास मदत करतात. आतड्यांची भिंत निरोगी ठेवण्यात मदत करतं. आतड्यांसंबंधीच्या गंभीर आजार रोखण्यास जेवणात नियमित तूप खाणं मदत करतं. तुपातील आरोग्यदायी ओमेगा फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास उत्तेजन मिळतं,. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आहारतज्ज्ञ आवर्जून गावठी तूप खाण्यास सांगतात.

लहानपणी जेवताना वडीलधारी मंडळी जेवणात गावठी अर्थात देशी तुपाला खूप महत्त्व द्यायचे. वरण भातावर, पुरण पोळीवर तुपाची धार आवश्यक मानणारी ही माणसं लाडू, शिरा, हलवा या गोडाच्या पदार्थात तुपाचा भरपूर प्रमाणात समावेश करायचे. धष्टपूष्ट राहायचं असेल तर रोज तूप खा असा सल्ला आवर्जून द्यायचे. पण तुपाचा वासच येतो, तूप खाऊन वजन वाढलं तर अशा अनेक कारणांनी अजूनही अनेकजण जेवणात तूपाचा दुस्वास करतात. पण गावठी तूप हे आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच वजन आटोक्यात ठेवतं आणि सौंदर्यही वाढवतं. आपल्या देशी तुपाचं महत्त्वं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य झालं असून तुपातील आरोग्यास लाभदायी अनन्यसाधारण गुणधर्मामुळे तुपाचा उल्लेख ‘द्रवरुप सोनं’ असा करण्यात आला आहे. 

रोज एक चमचाभर तूप जेवणात असण्याला खूप महत्त्व आहे. तुपामुळे दृश्यरुप परिणामांसोबतच आरोग्यास अदृश्य फायदेही मिळतात. पूर्वी तूप खाऊन रुप येतं म्हणायचे ते उगाच नाही. हजारो वर्षांपूर्वी सांगितलं गेलेलं देशी तुपाचं महत्त्व आजच्या काळतही तसंच अबाधित आहे.

तूप खाऊन मिळतं काय?

 - तुपामधे चरबी विरघळवणारे ड, के , इ आणि अ जीवनसत्त्वं असतात.तुपातील हे पोषक घटक आपल्या शरीराच्या क्रिया उत्तम होण्यास मदत करतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तूप हे शरीराला आहारातील पदार्थांमधून चरबी विरघळवणारे जीवनसत्त्वं आणि खनिजं शोषून घेण्यास उत्तेजन देतं. आपल्या प्रतिकारशक्तीला शरीराचं संरक्षण करण्यास ताकद पूरवतं. शिवाय देशी तुपात जीवाणूविरोधी, बुरशी विरोधी आणि अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट तत्त्वं असल्यानं तुपाच्या सेवनानं विषाणू, सर्दी, खोकला यापासून संरक्षण होतं.

- तुपात ब्यूट्रीक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. शरीरातील कोलन पेशी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ब्यूट्रीक अ‍ॅसिडचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. म्हणून देशी तूप पचन क्रिया सुधारुन शरीरास ऊर्जा देण्यास मदत करतात. आतड्यांची भिंत निरोगी ठेवण्यात मदत करतं. आतड्यांसंबंधीच्या गंभीर आजार रोखण्यास जेवणात नियमित तूप खाणं मदत करतं.

- तुपामधे आरोग्यदायी सॅच्यूरेटेड फॅटस ( सामान्य तापमानात गोठणारे चरबीयूक्त घटक) असतात. त्याचा उपयोग पेशींचं, ऊतींचं संरक्षण होण्यास, त्यांचं आयुष्य वाढण्यास होतो. रोज रिकाम्यापोटी देशी तूप खाण्याचा फायदा पेशींचं पुर्नज्जीवन होण्यात, शरीराची झालेली हानी भरुन काढण्यात होतो. तसेच काही झाल्यास बरं होण्याची शरीराची ताकद वाढवण्यास देशी तूप मदत करतं.

- देशी तुपात अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस, दाहविरोधी घटक असल्यानं त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते. त्वचेचा दाह, त्वचा काळवंडणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं या समस्या तूपामूळे दूर होतात. शिवाय शरीरातील विषारी घटक तुपाच्या नियमित सेवनानं शरीराबाहेर पडतात. तूप हे नैसगिक मॉश्चरायझर म्हणून काम करतं. देशी तुपाच्या नियमित सेवनानं त्वचेवर लाली येते आणि केसांचं आरोग्यही सुधारतं.

- देशी तुपातील मध्यम आणि छोट्या फॅटी अ‍ॅसिड साखळीमुळे शरीराला ऊर्जा देणारं हे सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. तुपातील आरोग्यदायी ओमेगा फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास उत्तेजन मिळते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आहारतज्ज्ञ आवर्जून गावठी तूप खाण्यास सांगतात. या महत्त्वाच्या लाभासोबतच हदय, डोळे उत्तम राखण्यास, कर्करोग रोखण्यास, बध्दकोष्ठतेवर इलाज म्हणून गावठी तुपाकडे बघितलं जातं. तेव्हा वजन वाढेल या गैरसमजूतीतून बाहेर पडून निश्चिंत मनानं गावठी तूप खा आणि छान दिसा!