Join us  

होल ग्रेन ब्रेड खाल्ला तर खरंच फायद्याचं ठरतं का? हा ब्रेक कुणी खावा, कुणी टाळावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 5:02 PM

ब्रेड, ब्रेडचे पदार्थ हल्ली सगळ्यांनाच आवडतात. पण म्हणून रोज ब्रेड खाणं किती फायदेशीर आहे? आरोग्यास फायदेशीर असा ब्रेड कोणता? ब्रेड कसा खाल्ला म्हणजे त्याचा अपाय होत नाहीत?

ठळक मुद्देव्हाइट ब्रेड हा धान्यावर अतिप्रक्रिया करुन बनवलेला असतो.अतिप्रक्रिया केलेली असल्याने यात पोषणमूल्यांचा अभाव असतो.धान्यावर अतिप्रक्रिया करुन केलेला व्हाइट ब्रेड हा स्थूलता, हदयरोग आणि मधुमेह या आजारांना आमंत्रण देतो.होल ग्रेन ब्रेड बनवताना धान्याचा कोणताही भाग टाकून दिला जात नाही. कोंडा, अंकूर आणि बीज हे धान्याचे तीन महत्त्वाचे घटक होल ग्रेन ब्रेडमधे असतात.वजन कमी करणाऱ्यांसाठी होल ग्रेन ब्रेड हा फायदेशीर मानला गेला आहे. कारण या ब्रेडमधून शरीरास आवश्यक तेवढीच उर्जा मिळते.ब्रेड हा जेवणाऐवजी कधी मधी नाश्त्यात आणि इतर पौष्टिक घटकांसोबत खाल्ला गेला तर तो फायदेशीर ठरतो.

ब्रेड हे आपलं मुख्य अन्न नाही. पण तरीही आता पूर्वीच्या तुलनेत ब्रेड खाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. नाश्त्याला ब्रेडचे पदार्थ, जेवणात जर पोळी खावीशी वाटत नसेल , पोळया करायचा कंटाळा आला असेल तर भाजीसोबत ब्रेड , मधल्या वेळेत चहा सोबत ब्रेड असं ब्रेड वरचेवर आहारात येवू लागलं आहे. मुख्य अन्न नसलं तरी अनेकांच्या आहारात रोज कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ब्रेड येत आहे. तेव्हा जे आपण वरचेवर आवडीनं खातोय ते आपल्या शरीराला काय देतं? ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक हे समजून घेणं गरजेचं आहे.

व्हाइट ब्रेड

ब्रेडचे विविध प्रकार आज उपलब्ध आहे. पण पांढरा रिफाइंड ब्रेड प्रामुख्याने खाल्ला जातो. सॅण्डविचेससाठीही तोच वापरला जातो. व्हाइट ब्रेड हा धान्यावर अतिप्रक्रिया करुन बनवलेला असतो. त्यामूळे या ब्रेडमधे तंतूमय घटकांची ( फायबरची) कमतरता असते. अतिप्रक्रिया केलेलं असल्याने यात पोषणमूल्यांचा अभाव असतो. अनेकदा उत्पादक आता बाहेरुन जीवनसत्त्वं आणि खनिजं व्हाइट ब्रेडमधे समाविष्ट करतात , पण त्याला धान्यातील नैसर्गिक जीवनसत्त्वं आणि पोषणमूल्यांची सर नसते. व्हाइट ब्रेडमधे प्रामुख्याने कर्बोदकं ( कार्बोहायडेÑट) हा घटक असतो. व्हाइट ब्रेड तयार करताना धान्यातील कोंडा, अंकुर हे महत्त्वाचे घटक काढले जातात. यात फक्त धान्यातील बीज असतं. त्यामूळे तो मऊ पोताचा आणि टिकाऊ होतो. व्हाइट ब्रेड करताना तंतूमय घटक, जीवनसत्त्वं, खनिजं काढलेली असतात. त्यामुळे उरलेल्या बीजातून फक्त कर्बोदकं मिळतात. धान्यावर अतिप्रक्रिया करुन केलेला व्हाइट ब्रेड हा स्थूलता, हदयरोग आणि मधूमेह या आजारांना आमंत्रण देतो.

होल ग्रेन ब्रेड फायदेशीर आहे का?

होल ग्रेन ब्रेडचे अनेक फायदे सांगितले जातात. हा ब्रेड आरोग्याला हानिकारक न ठरता फायदेशीरच ठरतो. होल ग्रेन ब्रेड हा ब्रेडमूळे वाढणारी स्थूलता आणि पचनाचे आजार याचा धोका कमी करतो. होल ग्रेन ब्रेड बनवताना धान्याचा कोणताही भाग टाकून दिला जात नाही. कोंडा, अंकुर आणि बीज हे धान्याचे तीन महत्त्वाचे घटक होल ग्रेन ब्रेडमधे असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने होल ग्रेन ब्रेडमधे ब जीवनसत्त्व, फोलिक अ‍ॅसिड, लोह, मॅग्नेशिअम, सेलेनिअम आणि तंतूमय घटक असतात. होल ग्रेल ब्रेडमधील तंतूमय घटक हदयाशी संबंधित आजार, टाईप २ मधूमेह, हायपर टेन्शन, उच्च रक्तदाब, कोलोन कॅन्सर आणि स्थूलता आदी आजारांचा धोका कमी करतात.

 वजन कमी करणाऱ्यासाठी होल ग्रेन ब्रेड हा फायदेशीर मानला गेला आहे. कारण या ब्रेडमधून शरीरास आवश्यक तेवढीच उर्जा मिळते. ब्रेड हा जेवणाऐवजी कधी मधी नाश्त्यात आणि इतर पौष्टिक घटकांसोबत खाल्ला गेला तर तो फायदेशीर ठरतो. म्हणूनच होल ग्रेन ब्रेडचे भाज्या घालून केलेले ग्रील्ड सॅण्डविच, भाज्यांच्या सूपसोबत होल ग्रेन ब्रेड खाणं फायदेशीर ठरतं. होल ग्रेन ब्रेड हे शरीरातील सूक्ष्म जीवाणूंसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे ब्रेड खायचंच झालं तर व्हाइल ब्रेड ऐवजी होल ब्रेड खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ देतात.

 

 

 

व्हाइट ब्रेड खाण्याचे धोके

१) व्हाइट ब्रेड मधे केवळ कब्रोदकांचं प्रमाण जास्त असतं. त्यामूळे रोज व्हाइट ब्रेड आहारात असला तर रक्तातील साखर वाढते. त्यातून टाइप २ मधूमेह, हदयरोग आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.

२) तो तेव्हा पोट भरल्यासारखं वाटत नाही. म्हणून पोट भरण्याची भावना होईपर्यंत खाल्लं जातं. यामूळे शरीराला आवश्यक असते त्यापेक्षा जास्त ऊर्जा मिळते. ती वापरली जात नाही. आणि मग या कॅलरीज शरीरात चरबीच्या स्वरुपात साठतात आणि त्यातून वजन वाढतं.

३) व्हाइट ब्रेडमधे तंतूमय घटकांचा अभाव असतो. त्यामुळे ते जर रोज आहारात असेल तर पोटातील सूक्ष्म जीवाणूंवर परिणाम करतात. त्यांच्यात असमतोल निर्मण करतात. त्याचाच परिणाम म्हणजे आतड्यांचा दाह सारखे गंभीर आजार उदभवतात.